गागोदे बुद्रुक शाळेत विद्यार्थ्यांचा आठवडा बाजार
व्यवहारज्ञानासोबत उद्योग-व्यवसायाची प्रेरणा देणारा उपक्रम
पेण, ता. २७ (वार्ताहर) : गागोदे बुद्रुक येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, आत्मविश्वास व उद्योगशीलतेची बीजे रुजविण्याच्या उद्देशाने आठवडा बाजार उत्साहात भरविण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन पेण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शर्मिला शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शर्मिला शेंडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला आठवडा बाजार हा अत्यंत स्तुत्य आणि नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. या माध्यमातून मुलांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे, तर प्रत्यक्ष व्यवहार, खरेदी-विक्री, नफा-तोटा, ग्राहकांशी संवाद यासारख्या महत्त्वाच्या बाबींचा अनुभव मिळतो. भविष्यात उद्योग-व्यवसायाकडे वळण्यासाठी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली येलवे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कृतीतून व्यवहारज्ञान देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. लहान वयातच विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाची ओळख झाल्यास त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करत शिक्षक व पालकांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. या आठवडा बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन विविध दुकाने उभारली होती. त्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, फळे, फुले, मोड आलेली कडधान्ये, कापडी पिशव्या, सौंदर्यप्रसाधने, स्टेशनरी साहित्य, खेळणी तसेच वजनकाटा आदी वस्तूंचा समावेश होता. खाद्यपदार्थांच्या दुकानांतून वडापाव, गुलाबजामून, आप्पे, उकडलेल्या शेंगा यांना विशेष मागणी होती. या उपक्रमाला उपस्थित मान्यवर, पालक व ग्रामस्थांनी ग्राहक बनून विद्यार्थ्यांकडून खरेदी करत चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा वैदेही जगताप, संदीप पाटील, ॲड. नितीन जेधे, रामकृष्ण भोईर, संजय कंक, उमेश गायकर, नीता पाटील, रामकृष्ण म्हात्रे, मारुती शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.