‘कॅमेरा बंद कर, नाहीतर फेकून देईन!’
माजी मंत्री जगन्नाथ पाटील पत्रकारांवर संतापले
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत सुरू असलेला संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. रविवारी डोंबिवलीत एका बाजूला भाजप कार्यकर्त्यांनी ‘स्वबळा’ची घोषणाबाजी केली, तर दुसरीकडे पत्रकारांच्या प्रश्नांनी संतप्त झालेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपला संयम गमावला. भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांना, ‘कॅमेरा बंद करा, नाहीतर फेकून देईन,’ अशी थेट धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
जागावाटपात भाजपच्या अनेक माजी नगरसेवकांना आणि इच्छुकांना डावलले जाण्याची शक्यता असल्याने भाजपमध्ये मोठा असंतोष आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ‘पलावा’ येथील निवासस्थानी रविवारी (ता. २८) सकाळी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांनी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांना महायुतीतील नाराजीबाबत प्रश्न विचारले. एरवी संयमी मानले जाणारे पाटील या वेळी अचानक संतापले आणि त्यांनी कॅमेरामनला कॅमेरा फेकून देण्याची धमकी दिली.
कार्यकर्त्यांचा ‘युती’ला विरोध
बैठकीच्या ठिकाणी जमलेल्या कार्यकर्त्यांनी, ‘शिवसेना-भाजप युती नको, आधी कार्यकर्त्यांना न्याय द्या,’ अशी आक्रमक भूमिका मांडली. शनिवारी (ता. २७) रात्री कल्याण पूर्वेतील माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाचे पडसाद आजच्या बैठकीतही उमटले. भाजपची संघटनात्मक ताकद मोठी असूनही शिवसेनेला झुकते माप दिले जात असल्याचा आरोप कार्यकर्ते करीत आहेत.
प्रतिमेला धक्का
शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याकडून पत्रकारांशी अशा प्रकारचे वर्तन झाल्याने सुशिक्षित नागरिक आणि पत्रकार संघटनांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांमधील हा वाढता तणाव भाजपच्या प्रतिमेला धक्का देणारा ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.