मुंबई

आमदारकीला साथ, महापालिकेची बिकट वाट!

CD

आमदारकीला साथ, महापालिकेची बिकट वाट!
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात अनेक प्रश्‍न प्रलंबित
नितीन जगताप ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांची कन्या सना मलिक निवडून आल्या आहेत. आघाडी असली तरी त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा मिळाला होता; मात्र महापालिकेचे राजकारण वेगळे असणार आहे. आमदार राष्ट्रवादीचा असला तरी एकही नगरसेवक राष्ट्रवादीचा नाही. राष्ट्रवादीसाठी पालिकेची वाट बिकट असणार आहे.
अणुशक्तीनगर या मतदारसंघात झोपडपट्टी पुनर्वसन, म्हाडा इमारतीत पाणी, कचऱ्याची समस्या, रस्त्याची रखडलेली कामे, पावसाळ्यात घरात शिरणारे पाणी, पायाभूत सुविधा, डोंगराळ वस्तीवर दरड कोसळण्याचा धोका या समस्या येथील मतदारांना मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. त्‍यामुळे येथील मतदार आपले मत कुणाच्या पारड्यात टाकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एकीकडे मुंबईला वीजपुरवठा करणारा औष्णिक वीज प्रकल्प, तेल शुद्धीकरण प्रकल्प व भाभा अणू संशोधन केंद्रासारखी महत्त्वाची प्रतिष्ठाने, दुसरीकडे झोपडपट्टीत राहणारा कामगारवर्ग, काही प्रमाणात मध्यमवर्गीय, मुंबईला पुण्याशी जोडणारा कायम व्यग्र पनवेल महामार्गदेखील येथेच आहे. दक्षिणेकडे समुद्र आणि पूर्वेकडे खाडी अशा सर्व मिश्र प्रकारे असलेला भाग म्हणजे अणुशक्तीनगर मतदारसंघ आहे.
या मतदारसंघात भारतनगर, वाशीनाका, सह्याद्रीनगर, अशोकनगर, पांजरापोळ, चिता कॅम्प आदी झोपडपट्टीबहुल भाग येतो. येथे झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्यात येत आहे. १५ वर्षांपूर्वी येथील काही घरे तोडण्यात आली आहेत; परंतु अद्यापही अनेकांचे पुनर्वसन झाले नाही.
मुंबई किंवा पश्चिम उपनगरात कामानिमित्त जाणारा मोठा कामगारवर्ग या भागात राहतो. अनेक रोजंदारीवर काम करणारे येथील देवनार, गौतमनगर, मंडाला, गोवंडी पूर्व, मानखुर्द पूर्व या भागात राहतात. हा भाग काही प्रमाणात झोपडपट्टीयुक्त आहे. त्यामध्ये उत्तर भारतीय व दाक्षिणात्य समाज मोठ्या प्रमाणात आहे. तर महाराष्ट्रनगर, पीएनजी कॉलनी, टाटानगर, महाराष्ट्रनगर, अयोध्यानगर या भागात काही प्रमाणात मराठी समाजाचे प्राबल्य आहे. ट्रॉम्बे कोळीवाडा प्रभाग येथील आणखी एक महत्त्वाचा भाग असून तेथे कोळी व मच्छीमार समाज अधिक संख्येने वास्तव्यास आहे. तर चिता कॅम्प परिसराचा प्रभाग उत्तर भारतीय, दाक्षिणात्य व मराठी भाषीकांचा आहे.
महाराष्ट्रनगरमधील भुयारी मार्गामध्ये साचत असलेल्‍या पावसाच्या पाण्यामुळे नागरिक हैराण होतात. अणुशक्तीनगर टेकडी भागात रानकुत्रे, कोल्हे यांच्यासारखी जंगली श्वापदे आहेत. अनेकदा ही श्वापदे वस्तीत शिरतात. त्यामुळे तेथील नागरिक कायम भीतीच्या छायेखाली असतात. या श्वापदांना अन्य जंगलात नेऊन सोडण्याची नितांत गरज आहे.

लोकसभा, विधानसभेतील चित्र
अणुशक्तीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई हे निवडून आले आहेत. तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) सना मलिक यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे फहाद अहमद यांचा पराभव केला होता.

मतदारांच्या प्रतिक्रिया
रहिवासी अस्लम शेख म्‍हणाले, वाशी नाका परिसर कायम गजबजलेला असतो. त्यात आता ट्रान्स हार्बर रस्त्याचे काम सुरू आहे. त्यानिमित्ताने कामगार वस्ती तिथे आहे; पण त्या भागात मोठ्या प्रमाणात कचरा व राडारोडा कायम पडलेला असतो. असाच कचरा चिता कॅम्प परिसरातदेखील असतो. तेथे नागरी सुविधांचा प्रचंड अभाव दिसून येतो, असे त्‍यांनी सांगितले. सुमन काटे म्‍हणाले, अशोकनगर परिसरात २,५०० घरे तोडण्यात आली आहेत. त्यातील केवळ ६०० घरे तयार आहेत; पण अजून चाव्या दिलेल्या नाहीत. रहिवाशांना भाडे भरताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पुनर्वसन तातडीने करणे गरजेचे आहे.

शिवसेनेचे प्राबल्य
या मतदारसंघात एकूण सात नगरसेवक आहेत. त्यापैकी शिवसेनेचे पाच, भाजपचा एक आणि एमआयएमचा एक असे बलाबल आहे. शिवसेनेच्या पाच नगरसेवकांपैकी चार नगरसेवक शिंदे गटासोबत आहेत, तर एक शिवसेना ठाकरे गटासोबत आहे.

२०१७ ला विजयी झालेले उमेदवार
प्रभाग क्रमांक १४२, वैशाली शेवाळे - शिवसेना (शिंदे गट)
प्रभाग क्रमांक १४३, ऋतुजा तारी - शिवसेना (शिंदे गट)
प्रभाग क्रमांक १४४, अनिता पांचाळ - भाजप
प्रभाग क्रमांक १४५, शाहनवाज शेख - एमआयएम
प्रभाग क्रमांक १४६, समृद्धी काते - शिवसेना (शिंदे गट)
प्रभाग क्रमांक १४७, अंजली नाईक - शिवसेना (शिंदे गट)
प्रभाग क्रमांक १४८, निधी शिंदे - शिवसेना (उबाठा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Election : पुण्यात मोठा ट्विस्ट! मनपा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार? उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

Municipal Elections 2025 : अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक; जागावाटपावरून युती-आघाडीत वाद; बैठकांवर बैठका, पण तोडगा निघेना, घोडं अडलंय कुठं?

Navneet Rana यांचा Thackeray वर घणाघात, 'उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला' | Sakal News

Akola Municipal Election 2025 : ठरलं! अकोल्यात शरद पवार गट अन् काँग्रेसची युती; ठाकरे गटाची भूमिका अजूनही गुलदस्त्यात

Vijayanagara Empire Heritage Site : विजयनगरचे वैभव आणि किष्किंधेचा इतिहास; सोलो ट्रिपमधून उलगडलेले हंपीचे सौंदर्य

SCROLL FOR NEXT