पनवेल, ता. २८ (बातमीदार) : महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शेवटचे दोन दिवस उरल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार आपापल्या प्रभागातून लढण्यासाठी अर्ज दाखल करणे सुरू झाले असले तरी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मुदतीत अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना कागदपत्रांची जुळवाजुळव, प्रतिज्ञापत्रे, बँक खाते उघडणे, मतदार यादीच्या प्रती मिळविणे अशा अनेक टप्प्यांतून जावे लागत आहे. त्याच उमेदवारी अर्जात झालेली छोटीशी चूकदेखील अर्ज बाद ठरण्याचे कारण ठरू शकते. त्यामुळे इच्छुक उमेदवार जाणकार व्यक्तीकडून विशेषतः वकील मंडळींकडून अर्ज भरून घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
उमेदवारी अर्जात उमेदवारांना २६ मुद्दे भरून द्यायचे आहेत. त्यामुळे हा अर्ज बघताच उमेदवारांना घाम सुटत आहे. कागदपत्रांसह हा उमेदवारी अर्ज अचूक भरणे तेवढेच महत्त्वाचे असल्याने शहरातील काही ठरावीक व्यक्तींकडून तसेच वकिलामार्फत अर्ज भरून घेतला जात आहे. त्यामुळे सध्या इच्छुक उमेदवारांची गर्दी तज्ज्ञ व्यक्ती व वकिलांकडे झालेली दिसून येत आहे.
३० हजारांपर्यंत खर्च
इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण मतदान प्रक्रियेतील कामे तज्ज्ञांकडून करून घेण्याचे ठरविले असल्याने उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांचा व्यवसाय तेजीत आल्याचे दिसून येत आहे. या संपूर्ण प्रक्रियेत उमेदवारांना मोठा खर्च करावा लागत असून, सरासरी २५ ते ३० हजारांचा आकडा गाठला जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना अनामत रक्कम जमा करणे, ही अनिवार्य अट आहे. त्याशिवाय प्रतिज्ञापत्रात सर्व मालमत्तांची माहिती ‘सीए’कडून भरणे, नोटरी करणे, आवश्यक कागदपत्रांच्या प्रती मिळविणे, नवीन बँक खाते तयार करणे अशा अनेक बाबींवर खर्च होत आहे.
सीए, वकिलांचा घेतला सल्ला
यात सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे अर्जात चूक होऊ नये. कारण अर्जातील किरकोळ चूकही उमेदवाराचा अर्ज बाद होण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे इच्छुक उमेदवार स्वतः अर्ज भरण्याऐवजी तज्ज्ञ व्यक्तीकडून अर्ज भरून घेत आहेत. वकील, चार्टर्ड अकाउंटंट तसेच निवडणूक प्रक्रियेचा अनुभव असलेल्या तज्ज्ञांकडे उमेदवारांचा ओढा वाढला आहे.
अर्ज भरण्यासाठी पाच हजार रुपये
एका अर्जासाठी तज्ज्ञांकडून सरासरी पाच हजार रुपये घेतले जात आहेत. उमेदवारांना अर्ज व्यवस्थित व नियमबद्ध पद्धतीने भरला जावा, यासाठी हे अतिरिक्त शुल्क देणे भाग पडत आहे. निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार अर्जातील प्रत्येक बाब अचूक असणे आवश्यक आहे. मालमत्तेची माहिती, बँक खात्याचे तपशील, मतदार यादीतील क्रमांक, शैक्षणिक पात्रता यासारख्या बाबींची नोंद करताना चूक होऊ नये, यासाठी उमेदवार तज्ज्ञांकडे घाव घेत आहेत.
उमेदवारासाठी येणारा खर्च (हजारमध्ये)
कागदपत्रे जमा करणे ४ ते ५
मतदार यादीच्या प्रती ५
अनामत रक्कम अडीच ते ५
उमेदवारी अर्ज भरणे ५
बँक खाते उघडणे ५
प्रतिज्ञापत्रात मालमत्ता विवरण ३ ते ५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.