बदलापूर, ता. २८ (बातमीदार) : अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदाच्या ५९ आणि नगराध्यक्ष पदाच्या एका अशा एकूण ६० जागांचे निकाल जाहीर होताच शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निकालांमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो मनसेच्या पार्श्वभूमीच्या चार उमेदवारांनी मिळवलेला दणदणीत व निर्विवाद विजय. पक्षांतरानंतरही मतदारांनी दिलेल्या स्पष्ट कौलामुळे ‘पक्ष नव्हे, काम निर्णायक’ हे समीकरण पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
मनसेचे शहरप्रमुख व माजी नगरसेवक कुणाल भोईर, त्यांच्या पत्नी अपर्णा भोईर, माजी नगरसेवक स्वप्नील बागुल; तसेच माजी नगरसेवक संदीप लकडे यांच्या प्रभागात महिला आरक्षण पडल्याने त्यांच्या पत्नी पल्लवी लकडे हे चारही उमेदवार शिंदे गटाच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मनसेतून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर या सर्वांवर राजकीय टीका व आरोपांची झोड उठली होती. मात्र निकालांनीच त्या टीकेला ठोस उत्तर दिले.
२०१० आणि २०१५ च्या निवडणुकांमध्ये मनसेच्या तिकिटावर निवडून येत या उमेदवारांनी अंबरनाथ शहरात रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधा, स्थानिक प्रश्नांची सोडवणूक तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणींसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेल्या कामांची छाप शहरात आजही दिसून येते. याच कामाच्या बळावर त्यांनी यंदाच्या निवडणुकीत पक्ष बदलल्यानंतरही मतदारांशी थेट संवाद साधत विकासकामांचा लेखाजोखा लोकांसमोर मांडला.
‘कामाच्या जोरावर विजय’
पक्ष बदलला असला तरी माणूस आणि काम तेच आहे, हा संदेश मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात हे उमेदवार यशस्वी ठरले. परिणामी, पक्षनिष्ठेपेक्षा कामगिरीला प्राधान्य देत मतदारांनी या चारही उमेदवारांवर विश्वास कायम ठेवला आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. या विजयामुळे अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत केवळ चार उमेदवारांचा वैयक्तिक राजकीय यशस्वी प्रवास अधोरेखित झाला नसून, भविष्यातील स्थानिक राजकारणात ‘कामाच्या जोरावर विजय’ हे समीकरण अधिक मजबूत होत असल्याचा स्पष्ट संदेश मतदारांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.