नेरळ डम्पिंग ग्राउंडमुळे कोल्हारे ग्रामस्थ हैराण
वारंवार लागणाऱ्या आगीमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न
सरपंच महेश विरले यांचे सीईओ नेहा भोसले यांना निवेदन
कर्जत, ता. २९ (बातमीदार) : कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीचे डम्पिंग ग्राउंड कोल्हारे ग्रामपंचायतीच्या हद्दीलगत असल्याने येथील ग्रामस्थांसाठी ते डोकेदुखी ठरत आहे. विशेषतः या डम्पिंग ग्राउंडला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
नेरळ ग्रामपंचायतीतील कचरा कोल्हारे ग्रामपंचायतीच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत टाकण्यात येतो. मात्र, कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता तो उघड्यावर टाकला जात असल्याने येथे सातत्याने आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर पसरून धामोते व कोल्हारे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मॉर्निंग सोसायटीच्या पुढील नाल्यालगत असलेल्या डंपिंग ग्राउंडमधील आगीमुळे श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ, तीव्र दुर्गंधी यांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. वृद्ध, लहान मुले तसेच आजारी व्यक्तींना याचा मोठा त्रास होत आहे. कधी कधी या धुरामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनाही अडचणी येत असल्याचे चित्र आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले यांनी ग्रामपंचायत सदस्यांसह रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची शुक्रवार (ता. २६) भेट घेऊन निवेदन दिले. डम्पिंग ग्राउंड तातडीने हटवून ते निर्जन ठिकाणी स्थलांतरित करण्याची ठाम मागणी या वेळी करण्यात आली.
दरम्यान, ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर सरपंच महेश विरले, रोशन मस्कर, सोमनाथ विरले यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी सुजित धनगर यांच्यासह डम्पिंग ग्राउंडला प्रत्यक्ष भेट देण्यात आली. कचरा जाळू नये, अशा स्पष्ट सूचना देत तातडीचा उपाय म्हणून कचरा खड्डा करून त्यात टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आगीमागील कारणांचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडेही करण्यात आली आहे.
चौकट
स्थलांतर हाच उपाय
नेरळ डम्पिंग ग्राउंड नागरी वस्तीच्या अगदी जवळ असल्याने भविष्यात आरोग्याच्या समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. वारंवार लागणाऱ्या आगी अपघाती की जाणीवपूर्वक, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. मात्र, तात्पुरत्या उपायांऐवजी डम्पिंग ग्राउंड निर्जन ठिकाणी स्थलांतरित करून वैज्ञानिक पद्धतीने कचरा व्यवस्थापन राबवणे हाच या समस्येवर कायमस्वरूपी आणि सुरक्षित उपाय असल्याची ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.
प्रतिक्रिया
नेरळ ग्रामपंचायतीच्या डम्पिंगमुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होत आहे. घनकचरा प्रकल्पावर कचरा जाळणे चुकीचे असताना मेडिकल वेस्टसह इतर कचरा जाळला जात आहे. दुर्गंधीयुक्त धुरामुळे वृद्ध, लहान मुले आणि नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. नागरी वस्तीतील हे डम्पिंग तातडीने निर्जन ठिकाणी हलवावे.
- महेश विरले, सरपंच, कोल्हारे ग्रामपंचायत