वाशी, ता. २९ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम शहरात जोरात वाजू लागले आहे. तब्बल साडेदहा वर्षांनंतर ही निवडणूक होत असल्याने संपूर्ण नवी मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला आहे. मागील सहा ते सात वर्षांपासून अनेक इच्छुक उमेदवार आपापल्या प्रभागांमध्ये सातत्याने सक्रिय आहेत. विविध सामाजिक, धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रम, विकासकामे, तसेच मदतीच्या उपक्रमांद्वारे मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे यंदाची महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे.
राज्यातील सत्ताधारी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. शिवसेना, भाजप आणि इतर घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून चर्चांचे गुऱ्हाळ कायम असून, अंतिम निर्णय न झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही प्रामुख्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच उवारीमेद देण्यावर भर दिला जात असल्याने अनेक सक्रिय इच्छुक उमेदवारांना उमेदवारी डावलली जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी उघडपणे व्यक्त होत असून, काही ठिकाणी बंडखोरीचा सूरही सुरू आहे.
पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुक उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. मात्र, उमेदवारी अर्ज भरणाऱ्या काही उमेदवारांवर ना अर्ज न भरण्याचा दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचे आरोप समोर येत आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी राजकीय दबाव, अप्रत्यक्ष धमक्या आणि विविध प्रकारच्या अडचणी निर्माण करून उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडले जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
खोपोलीतील घटनेचे पडसाद
अलीकडेच खोपोली येथे शिवसेना (शिंदे गट) नेते मंगेश काळेखे यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडल्याने राज्यात राजकीय वातावरण हादरले आहे. या घटनेचा धसका नवी मुंबईतही घेण्यात येत असून, येथेही विविध पक्षांचे पदाधिकारी एकमेकांचे कट्टर विरोधक बनले आहेत. राजकीय टीका-टिप्पणी आता खालच्या पातळीवर पोहोचली असून, वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वैमनस्यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगावी, बंदोबस्त वाढवावा, तसेच निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, अशी जोरदार मागणी इच्छुक उमेदवार आणि राजकीय कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये कोणावर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव किंवा धमकी येत असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा. पोलिसांकडून निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
- पंकज डाहणे, उपआयुक्त, नवी मुंबई पोलिस परिमंडळ १
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.