पनवेलमध्ये रुग्णोपयोगी साहित्य केंद्राची सुरुवात
पनवेल, ता. ३० (बातमीदार) : पनवेल शहरात गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात आले असून, या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. सेवाभारती कोकण प्रांत ट्रस्ट यांच्या माध्यमातून पनवेल येथील डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयात हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. आजच्या काळात आजारपणात रुग्णोपयोगी साहित्य खरेदी करणे अनेकांसाठी खर्चिक ठरत असते. हीच गरज ओळखून अत्यल्प दरात व भाडेतत्त्वावर हे साहित्य उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे.
या सेवाकार्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महर्षी वाल्मिकी शाखा व नंदनवन शाखेतील सेवाभावी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. सेवाभारती संस्थेकडून काही प्राथमिक रुग्णोपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून, उर्वरित साहित्य स्वयंसेवकांनी स्वेच्छेने दिलेल्या देणग्यांतून उभारण्यात आले आहे. या केंद्रासाठी आवश्यक जागा तसेच प्राथमिक सहकार्य डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाकडून देण्यात आले आहे. या केंद्रामार्फत फाउलर बेड, एअर बेड, वॉटर बेड, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, व्हील चेअर, वॉकर, कमोड चेअर, नेब्युलायझर, वॉकिंग स्टिक, विविध प्रकारचे पॉट तसेच काही वैद्यकीय बेल्ट यांसारखे अत्यावश्यक साहित्य अत्यल्प भाडे व डिपॉझिटवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. भविष्यात गरज लक्षात घेऊन या साहित्यात आणखी भर घालण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला आहे. साहित्य वाटप, नोंदवही ठेवणे तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांशी प्रेमळ संवाद साधण्याची जबाबदारी संबंधित शाखेतील स्वयंसेवक पार पाडणार आहेत. हे केंद्र आठवड्याचे सातही दिवस सायंकाळी ५ ते ७ या वेळेत खुले राहणार आहे.