सीटी-स्कॅनच्या मदतीने शवविच्छेदन
चिरफाड न करता मृत्यूच्या कारणाचा शोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना आता शवविच्छेदन प्रक्रियेतही मोठा बदल होणार आहे. राज्य सरकारने सरकारी रुग्णालयांमध्ये टप्प्याटप्प्याने ‘नॉन इन्व्हिसिबल ऑटोप्सी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पद्धतीत सीटी-स्कॅनच्या मदतीने चिरफाड न करता मृत्यूचे कारण शोधले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात मुंबईतील केईएम आणि जेजे रुग्णालयात ही सुविधा सुरू केली जाणार आहे. या निर्णयामुळे मृत्यूच्या कारणांचा अधिक अचूक, वैज्ञानिक आणि विश्वासार्ह निष्कर्ष मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आरोग्य आणि न्याय व्यवस्थेसाठी हा निर्णय महत्त्वाचा आणि सकारात्मक टप्पा मानला जात आहे. जवळपास ८५ टक्के प्रकरणांमध्ये शवविच्छेदनात चिरफाड करण्याची गरज नसते. मात्र सर्वसामान्य नियमांनुसार मृत्यूनंतर चिरफाड केली जाते. सीटी-स्कॅन रिपोर्ट ऑटोप्सीमुळे मृत्यूच्या कारणांची सविस्तर व अचूक माहिती मिळणार असून, न्यायालयीन प्रकरणांमध्येही मोठी मदत होणार आहे. अपघात, खून, आत्महत्या किंवा संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणांत न्यायाधीशांना ठोस निष्कर्ष काढणे अधिक सोपे होणार आहे. तसेच सर्व अहवाल डिजिटल स्वरूपात दीर्घकाळ सुरक्षित ठेवता येणार असल्याने भविष्यात गरज भासल्यास त्याचा अभ्यास करणे शक्य होणार आहे.
...
समितीसमोर सादरीकरण
पालिकेच्या एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले, की डिजिटल ऑटोप्सीच्या संदर्भात फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. हरीश पाठक यांनी संबंधित समितीसमोर सादरीकरण केले आहे. हा प्रस्ताव आगामी आठवड्यात अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) यांच्याकडे पाठवण्यात येणार असून, त्यानंतर राज्य सरकारकडे मान्यतेसाठी सादर केला जाईल. सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर आवश्यक यंत्रसामग्री खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. या समितीचे अध्यक्ष पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा आहेत. जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी डिजिटल ऑटोप्सीसाठी फॉरेन्सिक विभागाचे नवीनीकरण सुरू असल्याची माहिती दिली आहे.
...
म्हणजे नेमके काय?
नॉन इन्व्हिसिबल ऑटोप्सीमध्ये सीटी-स्कॅन, एमआरआय आणि अन्य प्रगत इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करून शरीराच्या आतल्या अवयवांची तपासणी केली जाते. या प्रक्रियेत मृतदेहाची चिरफाड करण्याची आवश्यकता नसते आणि मृत्यूचे कारण तुलनेने कमी वेळेत व अचूकपणे समोर येते. या ऑटोप्सीचा उपयोग केवळ शवविच्छेदनापुरता मर्यादित नसून, वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्टरांच्या प्रशिक्षणासाठी तसेच फॉरेन्सिक मेडिसिनमधील संशोधनासाठीही तो उपयुक्त ठरणार आहे.
....
वेळेची बचत
या पद्धतीमुळे शवविच्छेदनासाठी लागणारा वेळ कमी होणार असून, मृताच्या नातेवाइकांच्या भावना आणि संवेदनशीलतेचा अधिक आदर राखता येणार आहे. पहिल्या टप्प्यातील प्रयोग यशस्वी ठरल्यास राज्यातील अन्य सरकारी रुग्णालयांमध्येही ऑटोप्सी सुविधा सुरू केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.