शिवकालीन नृत्याच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे धडे
लिटिल जिनियस प्री-स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात
कल्याण, ता. ३० (वार्ताहर) : बापगाव येथील लिटिल जीनियस प्री स्कूलमध्ये नुकताच वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला सम्राट अशोक स्कूलचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, उपाध्यक्ष रंगोत्सव सेलिब्रेशन शरद घोलप, इव्हेंट डायरेक्टर कल्याण नितीन मोढवे, वृंदावन सोसायटी अध्यक्ष दादासाहेब बोंद्रे, सचिव राजेश चौधरी व खजिनदार संतोष शिंदे, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रत्येक वेळेस लिटिल जीनियस प्री स्कूलच्या माध्यमातून वार्षिक स्नेहसंमेलनाचा मनोरंजन कार्यक्रमांमधून विविध स्वरूपाचे समाज प्रबोधन करण्यात येते. यावर्षी देखील सध्याच्या काळानुसार स्त्रियांवर व मुलींवर अत्याचार होतो. त्यासाठी काळानुसार मुलींना सशक्त आणि स्वावलंबी होणे अतिशय महत्त्वाचे आहे. मानसिक आणि शारिरीकरित्या मजबूत होण्यासाठी त्यांना कराटेमध्ये पारंगत करून स्वतःचे आत्मसंरक्षण करावे. यासाठी गाण्याच्या नृत्याच्या माध्यमातून त्यांना संदेश देण्यात आला. तर, शिवाजी महाराजांच्या गाण्यावर नृत्याचे सादरीकरण करत समाजाला एकात्मतेचा संदेश दिला. शाळेच्या मुख्याध्यापिका संचिता शिंदे यांनी शाळेच्या प्रगतीविषयी सांगितले. यावर्षी कराटे अबॅकस याच्या माध्यमातून मुलांना नवीन पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचेही त्यांनी सांगितले.