ठाकरे गटाच्या शिलेदाराचा राजकीय संन्यास
निवडणूक न लढवण्याचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : ठाणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठी माजी नगरसेवकांसह हौशी इच्छुकांनी देव पाण्यात घालून ठेवले आहेत; मात्र दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे शिलेदार माजी उपमहापौर नरेश मणेरा यांनी राजकीय संन्यास घेतला आहे. ठाण्यात पक्षाची अधोगती होत असून, दुसऱ्या पक्षात जाऊन निष्ठा गमावण्यापेक्षा यापुढे कोणतीच निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिवसेनेते दोन गट झाल्यानंतर हातावर मोजण्या इतकेच माजी नगरसेवक ठाकरे गटात टिकून राहिले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपला किल्ला लढवत ठाण्यात ठाकरे गट जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यामध्ये माजी उपमहापौर नरेश मणेरा यांचे नाव सन्मानाने घेतले जात होते. घोडबंदरच्या आनंदनगर भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. प्रभाग क्रमांक एकमधून सलग नगरसेवक म्हणून ते या प्रभागातून निवडून येत होते. शिंदे गटातील काही नगरसेवकांना पुन्हा ठाकरे गटाकडे त्यांनी वळवले होते. त्यांनतर विधानसभा निवडणूकही त्यांनी लढवली. त्यात त्यांना अपयश आले होते. तेव्हापासूनच मणेरा पक्ष आणि राजकारणापसून अलिप्त राहिले होते.
ठाकरे गटाला धक्का
आता महापालिका निवडणुकीत मणेरा परत कमबॅक करतील, अशी अपेक्षा होती. शिवसेना ठाकरे गटातून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती, पण यापुढे निवडणूकच लढवणार नाही, अशी भूमिका त्यांनी सकाळकडे व्यक्त केली आहे. शिंदे गटाकडे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची फौज असताना ठाकरे गटाचे आतापर्यंत साथ देणारे शिलेदारही साथ सोडून जात असल्यामुळे हा मोठा धक्का मानला जात आहे.
रणनीती कमकुवत
सत्ताधारी युतीमुळे अनेक इच्छुकांचा नाराज गट तयार झाला आहे. त्यापैकी काहींचा ठाकरे गटातून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. रविवारी रात्री भाजपच्या अशाच एका इच्छुकाने उमेदवारीसाठी माजी खासदार राजन विचारे यांची भेट घेतली होती. पॅनेलमधील दोन जागा निवडून आणण्याची हमीही देण्यात आली, पण मनसेला जागावाटप झाल्याचे कारण देत त्याला परत पाठवल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.