मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. २९ : कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी पदभार स्वीकारताना बदलापूर शहर भ्रष्टाचारमुक्त करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. प्रशासक काळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. बदलापूर हे मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिकांचे शहर असून, त्यांच्यावर आर्थिक ओझे टाकणार नाही, असे सांगत पालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या काही करांवर ५० टक्के सवलत देण्याची घोषणाही त्यांनी केली. शहराचा कारभार स्वच्छ, पारदर्शक आणि विकासाभिमुख राहील, असे नगराध्यक्षा घोरपडे यांनी स्पष्ट केले.
कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी वडवली येथील डंपिंग हटवण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले. बदलापूर शहरात इतर शहरांचा कचरा आणला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार किसन कथोरे यांनी दिला. बदलापूरला कचरा डेपो बनू देणार नाही, असा निर्धार व्यक्त करत वडवली डंपिंगवर ‘लाल दिवा’ दाखवण्यात आला आहे. या निर्णयामुळे बदलापूरकरांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. स्वच्छ शहर आणि स्वच्छ कारभार हा नगराध्यक्षांचा मुख्य अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, औपचारिक पदभार स्वीकारण्यापूर्वी सकाळी नगराध्यक्षा घोरपडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना मानवंदना अर्पण केली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि भाजप-राष्ट्रवादी युतीच्या जयघोषात भव्य रॅली काढत त्यांनी पालिकेत प्रवेश केला. या जल्लोषात आमदार किसन कथोरे, कॅबिनेट मंत्री व परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशीष दामले, भाजप गटनेते व माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्यासह दोन्ही पक्षांचे विजयी उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाजप-राष्ट्रवादी युतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची मते निर्णायक ठरल्याने पालिकेतील सत्तेचे नवे समीकरण स्पष्ट झाले आहे. लवकरच उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या प्रियांका दामले यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वडवली येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे बदलापूर शहराची दिशा नव्हे, तर दशा बदलण्याची भीती आहे. अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या तिन्ही शहरांचा कचरा येथे एकत्र करून प्रक्रिया करण्याचा हा प्रकल्प आहे. भविष्यात तो बदलापूरकरांसाठी घातक ठरू शकतो. या प्रकल्पासाठी मिळणारा निधी थांबवण्यासाठी आणि प्रकल्प रद्द करण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तीव्र विरोध नोंदविण्यात येणार आहे
- किसन कथोरे, आमदार
बदलापूर शहर भ्रष्टाचारमुक्त करणे हा मुख्य अजेंडा आहे. नागरिकांसाठी आजपासून करात ५० टक्के सवलत जाहीर करत आहोत. स्वच्छ बदलापूरसाठी विशेष मोहीम राबविली जाईल. बदलापुरात सार्वजनिक शौचालये, रेल्वे समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा, मेट्रो प्रकल्प वेगाने मार्गी लावणे; तसेच २०० खाटांचे अद्ययावत शासकीय रुग्णालय लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
- रुचिता घोरपडे, नगराध्यक्षा, कुळगाव बदलापूर नगर परिषद
सुशिक्षित व सुसंस्कृत उमेदवारांना बदलापूरकरांनी सत्तेची संधी दिली आहे. राष्ट्रवादी-भाजप युतीतून बदलापूरमध्ये विकासाची नांदी झाली आहे. भविष्यात हेच विकासाचे मॉडेल राज्य व केंद्र पातळीवरही पाहायला मिळेल. दोन्ही पक्ष एकत्रितपणे बदलापूरसाठी विकासाभिमुख कारभार राबवतील.
- आशीष दामले, अध्यक्ष, परशुराम आर्थिक विकास महामंडळ
बदलापूर : बदलापूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.