गतिरोधकांचा अभाव ठरतोय जीवघेणा
काटेमानिवली-चिंचपाडा मार्गावर पादचाऱ्यांचा जीव मुठीत
कल्याण, ता. २८ (बातमीदार) : काटेमानिवली ते चिंचपाडा रस्त्याचे महिन्याभरापूर्वी डांबरीकरण करून हा मार्ग खड्डेमुक्त करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्यावरील वाहतूक सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. शाळा-महाविद्यालयांची गर्दी असलेल्या या रस्त्यावर गतिरोधक नसल्यान वेगवान वाहनचालक नागरिकांसाठी संकट ठरत आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी रिक्षा अपघातात एका महिलेने जीव गमावला होता. तरीही प्रशासन गतिरोधक उभारण्यासाठी उदासीन असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
काटेमानिवली ते चिंचपाडा रस्त्याचे महिन्याभरापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. परंतु, या रस्त्यावर गतिरोधक उभारण्यात आलेला नाही. पूर्वी असलेले काही गतिरोधक देखील रस्त्याच्या दुरुस्तीनंतर समतल होत गेले आहेत. त्यामुळे वयोवृद्ध, महिला व विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागत आहे. अयप्पा मंदिर परिसरात निमुळती जागा असल्याने फुटपाथअभावी पादचाऱ्यांना चौफेर लक्ष ठेऊन मार्गस्थ व्हावे लागते. वाहतूक पोलिस आणि आरटीओ यांनी या रस्त्याची कधी तपासणी केली आहे का? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
चिंचपाडा रोड हा कल्याण पूर्वेचा महत्त्वाचा दुवा असून या रस्त्यावरील लोकवस्ती चिंचपाडा, उल्हासनगर, आशेळे, माणेरे गावांमार्गे अंबरनाथपर्यंत विस्तारली आहे. परंतु, इतक्या मोठ्या वाहतुकीचा मार्ग असूनही प्रशासनाचे लक्ष या भागाकडे नाही. या मार्गावरील सर्वसमावेशक सुसज्ज वाहतुकीसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता नागरिकांकडून जोर धरत आहे.
बेशिस्त रिक्षाचालकांची अराजकता
काही बेशिस्त रिक्षाचालकांची अराजकताही चिंतेचा विषय बनली आहे. या मार्गातून प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या काही रिक्षा अनधिकृत असून काही अंमली पदार्थांचे सेवन करून वाहने चालवतात. अशातून छोटे-मोठे अपघात घडत असतात. वाहतूक नियमांचे कुणालाच भान नाही, तरुण चालकांचे सुसाट हॉर्न आणि वेग नागरिकांसाठी डोकेदुखी बनली आहे.
रस्त्यावरच वाहने उभी
अनेक ठिकाणी रस्त्यावरच वाहने उभी केली जातात, त्यामुळे त्या भागातील कचरा साफसफाईकरिता जागा उपलब्ध राहत नाही. मागील २० वर्षांत रस्त्यावर थरावर थर डांबर टाकल्याने रस्त्याची उंची जवळपास दोन फूट झाली असून व्यापाऱ्यांच्या गाळ्यांत पावसाचे पाणी शिरते.