वसई-विरारमध्ये राजकीय भूकंप
तिकीट वाटपावरून नाराजी नाट्य; बंडखोरी आणि पक्षांतराचा धडाका
प्रसाद जोशी ः सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. ३० ः वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. ३०) राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. तिकीट न मिळाल्याने निर्माण झालेली नाराजी, निष्ठावंतांची गळचेपी आणि ऐनवेळी केलेली युती यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठे भूकंप झाले आहेत. या बदलत्या समीकरणांमुळे आगामी निवडणुकीत प्रस्थापित सत्ताधारी आणि विरोधकांसमोर मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि निष्ठावंत कार्यकर्ते शेखर धुरी यांना पक्षाने तिकीट डावलल्याने त्यांनी थेट बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडून (बविआ) उमेदवारी अर्ज दाखल केला असून, हा भाजपसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. तसेच राजकारणातील सर्वात मोठी आणि अनपेक्षित घडामोड म्हणजे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर आणि स्वराज्य अभियानचे संस्थापक धनंजय गावडे यांच्यातील दिलजमाई. सामाजिक प्रश्न आणि पारदर्शक प्रशासनाच्या मुद्द्यावर या दोन शक्तींनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेतील लढत आता अधिक चुरशीची होणार आहे. भाजपचे निष्ठावंत नेते शेखर धुरी यांनी पक्ष सोडल्यामुळे भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी उघडपणे समोर आली आहे. तर हितेंद्र ठाकूर आणि धनंजय गावडे एकत्र आल्यामुळे स्थानिक सत्तेसाठी एक नवीन आणि मोठी राजकीय ताकद निर्माण झाली आहे.
महायुतीत बिघाडी?
लोकसभेत महायुतीसोबत असलेल्या आरपीआयला महापालिकेत एकही जागा न सोडल्याने जिल्हाध्यक्ष ईश्वर धुळे यांनी भाजपला ‘रामराम’ ठोकला आहे. आरपीआयने आता बहुजन विकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
शिंदे गट नाराज
नालासोपारा प्रभाग ११ मधून आग्रही असलेल्या महिला शहरप्रमुख रुचिता नाईक यांना डावलून भाजपने सर्व जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून, भाजप नालासोपाऱ्यातून शिवसेना संपवत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
भाजपमध्येही आऊटगोइंग जोरात
भाजपमध्ये झालेली मोठी ‘इनकमिंग’ आता ‘आऊटगोइंग’मध्ये बदलताना दिसत आहे. तिकीट वाटपातील गोंधळ आणि आश्वासनांची पूर्तता न झाल्याने अनेक इच्छुकांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. या ‘नाराजी नाट्याचा’ फटका कोणाला बसणार आणि नवीन युतीचा फायदा कोणाला होणार, हे आता निवडणुकीच्या निकालातच स्पष्ट होईल.
अपक्ष उमेदवारी
तिकीट न मिळाल्याने अनेक इच्छुकांनी अपक्ष अर्ज भरले आहेत, यामुळे अधिकृत उमेदवारांच्या मतांचे विभाजन होऊन निवडणुकीत मोठे फेरबदल होऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.