सत्ताधाऱ्यांची अंतर्गत लढाई निर्णायक ठरणार
किंवा
विरोधकांपेक्षा सत्ताधाऱ्यांचीच खरी परीक्षा
अंतर्गत संघर्ष, वर्चस्वाची लढाई आणि नाराजी ठरणार निर्णायक
शर्मिला वाळुंज ः सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० ः कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची आगामी निवडणूक ही सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशी न राहता, सत्ताधारी गटांमधील अंतर्गत संघर्ष, वर्चस्वाची चढाओढ आणि वाढती नाराजी यावर अधिक अवलंबून राहणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे. विरोधकांचे आव्हान तुलनेने मर्यादित असताना, सत्ताधाऱ्यांसाठी ही निवडणूक स्वतःचीच परीक्षा ठरण्याची शक्यता आहे.
कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांची संघटनात्मक स्थिती सध्या कमकुवत झाली आहे. एकेकाळी स्थानिक राजकारणात प्रभावी असलेले अनेक पदाधिकारी, शाखाप्रमुख, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते गेल्या काही काळात सत्ताधारी शिंदे गट किंवा भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांची संघटनात्मक धार बोथट झाली असून, स्वतंत्रपणे निवडणूक निकालावर प्रभाव टाकण्याची त्यांची क्षमता लक्षणीयरीत्या घटली आहे. काही भागांत भावनिक मतपेढी अस्तित्वात असली, तरी ती निर्णायक ठरेल, अशी परिस्थिती सध्या दिसत नाही. शिंदे गट आणि भाजप यांची युती अधिकृतरीत्या अस्तित्वात असली, तरी प्रत्यक्षात ही निवडणूक परस्पर स्पर्धेचीच ठरण्याची शक्यता आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका झाल्यापासून सत्तेत शिवसेना आणि भाजपा यांची युती राहिली आहे. यातही शिवसेनेची भूमिका मोठ्या भावाची राहिली आहे. यावरून कल्याण हे शिवसेनेचा बालेकिल्ला हे समीकरण बनले. परंतु, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात दुभंगली गेली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा शिवसैनिक येथे मोठ्या प्रमाणात असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
तर, केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने भाजपचे वजन वाढले आहे. ठाण्याचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपा सज्ज झाली आहे. अंबरनाथ-बदलापूरमध्ये शिवसेनेचे दिग्गज बुरुज ढासळून पहिला ट्रेलर भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दाखवून दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी चव्हाण यांचे हितसंबंध चांगले राहिले असले तरी त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी त्यांचे सूत कधी जुळल्याचे दिसून आले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ही नाराजी स्पष्टपणे दिसून आली होती.
यामुळेच आगामी महापालिका निवडणुकीत या दोघांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहे. भाजपा आणि शिंदे गट युतीच्या जागावाटपामध्ये फारसा फरक नसल्यामुळे कोणाचा प्रभाव अधिक, कोणाची संघटनात्मक ताकद जास्त, हे निकालातूनच सिद्ध करण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न दिसून येतो. त्यामुळे युती असूनही दोन्ही पक्ष आपापल्या उमेदवारांच्या संख्येवर आणि विजयाच्या आकड्यावर अधिक भर देताना दिसत आहेत. एकंदर पाहता, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक ही सत्ताधाऱ्यांसाठी संधीपेक्षा कसोटी अधिक ठरणार आहे. विरोधकांचे आव्हान मर्यादित असले, तरी अंतर्गत संघर्ष, वर्चस्वाची लढाई आणि नाराजीचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने झाले नाही, तर त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो.
अंतर्गत स्पर्धा
शिंदे गटाकडे महापालिकेतील सत्तेचा अनुभव, प्रशासनावर असलेली पकड आणि स्थानिक पातळीवरील जुनी यंत्रणा हे प्रमुख बलस्थान आहे. तर, भाजपकडे संघटनात्मक शिस्त, केंद्र व राज्यातील सत्तेचा आत्मविश्वास आणि नव्या चेहऱ्यांची वाढती फळी आहे. या दोन ताकदी एकत्र असल्या, तरी त्या एकमेकांच्या पूरक ठरण्याऐवजी अनेक ठिकाणी स्पर्धात्मक ठरत असल्याचे चित्र आहे. काही प्रभागांमध्ये ही स्पर्धा उघडपणे न दिसता, पडद्यामागील पातळीवर उमेदवार पाडण्याच्या प्रयत्नांपर्यंत जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
या अंतर्गत संघर्षाचा सर्वात मोठा परिणाम नाराजांच्या वाढत्या फळीच्या रूपाने समोर येण्याची शक्यता आहे. तिकीट न मिळाल्याने, अपेक्षित प्रभाग न मिळाल्याने किंवा स्थानिक नेतृत्वाकडून डावलल्याची भावना झाल्याने अनेक इच्छुक अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. काही प्रभागांमध्ये हेच अपक्ष उमेदवार निवडणुकीचा निकाल ठरवणारे ठरू शकतात. त्यामुळे विरोधकांकडून फारसे आव्हान नसले, तरी सत्ताधारी पक्षांचे अधिकृत उमेदवारच अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजकीय भूमिकेचा मतदारांमध्ये संभ्रम
विकासकामांबाबत नागरिकांमध्ये संमिश्र भावना आहेत. काही भागांत पायाभूत सुविधा सुधारल्या असल्या, तरी अनेक प्रकल्प रखडलेले आहेत. वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, अनधिकृत बांधकामे आणि नागरी सुविधांबाबतचा असंतोष मतदारांच्या मनात आहे. मात्र, या मुद्द्यांचा थेट फायदा विरोधकांना होण्याऐवजी, सत्ताधारी युतीतील घटकांमध्येच एकमेकांवर दोषारोप करण्यासाठी त्यांचा वापर होण्याची चिन्हे आहेत. ‘हे काम आमच्या काळात झाले’ आणि ‘या अडचणींसाठी दुसरा घटक जबाबदार आहे’ अशी राजकीय भूमिका मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करू शकते.
कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक त्यामुळे बहुतेक प्रभागांमध्ये तिरंगी, चौरंगी, तर काही ठिकाणी नाराज अपक्षांमुळे पंचरंगी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होणार असून, कमी फरकाने निकाल लागण्याची शक्यता वाढणार आहे. याचा फायदा संघटनात्मकदृष्ट्या शिस्तबद्ध उमेदवारांना होऊ शकतो, तर गटबाजीचा फटका प्रभावी उमेदवारांनाही बसू शकतो.