ठाण्यात रंगला राजकीय आखाडा
महायुतीत ‘नाराजी नाट्य’; उमेदवारी अर्जांसाठी प्रभाग समित्यांवर झुंबड
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० ः ठाणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या दोन्ही घटक पक्षांनी पक्षातील बंडाळीसह नाराज महाविकास आघाडीकडे जाऊ नये, यासाठी महायुतीने काळजी घेतल्याचे दिसून आले. सोमवारी रात्री उशिरा उमेदवारांना महायुतीसह महाविकास आघाडीने एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली. या वेळी महायुतीत मोठ्या प्रमाणात नाराजी उफाळल्याचे दिसून आले. काही नाराजांनी थेट कार्यालयात जाऊन राडा घातल्याचे दिसून आले. अशीच तणावाची परस्थिती अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत तणावाचे वातावरण भाजप आणि आनंद आश्रमाबाहेर दिसून आले. दुसरीकडे ज्या उमेदवारांना एबी अर्ज मिळाले, त्यांनी बँडबाजाचा गजर, ढोल-ताशांचा निनाद, समर्थकांची गर्दी आणि घोषणाबाजीमुळे अर्ज भरण्याआधीच उमेदवारांनी आपापली ताकद दाखवली. सत्ताधारी- विरोधक, पक्षीय-अपक्ष अशा सर्वच गटांनी शक्तिप्रदर्शन करत वातावरण तापवले आणि शेवटच्या क्षणापर्यंत नऊही प्रभाग समिती कार्यालयांवर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाल्याचे चित्र दिसून आले.
महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातच महायुती आणि महाविकास आघाडीने शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटपाचे गुऱ्हाळ सुरूच असल्याचे दिसून आले. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या एक दिवस आधी म्हणजेच सोमवारी रात्री उशिरा युतीचे जागावाटप अंतिम करीत, उमेदवारीसाठी एबी फॉर्म देण्याची सुरुवात केली. त्यामुळे सोमवारी मध्यरात्रीपासून इच्छुकांनी आपापल्या पक्षाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून बसल्याचे चित्र दिसून आले. तसेच आपल्याला उमेदवारी मिळाली नसल्याने अनेक दिग्गज व पक्षनिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तशीच काहीशी परिस्थिती रात्रभर सर्वच पक्ष कार्यालयांबाहेर दिसून आले.
धक्कातंत्राचा वापर
यंदा महायुतीने (भाजप आणि शिवसेना शिंदे गट) अनेक दिग्गज माजी नगरसेवकांना डच्चू देत ‘धक्कातंत्रा’चा वापर केला आहे. भाजप आणि शिवसेना कार्यालयाबाहेर (आनंद आश्रम) सोमवारी रात्रीपासूनच तणावाचे वातावरण होते. तिकीट कापल्या गेलेल्या काही नाराज पदाधिकाऱ्यांनी थेट पक्ष कार्यालयात जाऊन राडा घातला. महायुतीत डावलल्या गेलेल्या अनेकांनी तातडीने शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) किंवा मनसेचा मार्ग धरला, तर काहींनी ‘अपक्ष’ लढण्याचा निर्धार करीत शड्डू ठोकला आहे.
शक्तिप्रदर्शन
ज्यांना एबी अर्ज मिळाले, त्या उमेदवारांनी मंदिरांत देवांचे दर्शन घेत शक्तिप्रदर्शन केले. अर्ज भरण्याआधीच उमेदवारांनी आपापली ताकद दाखवली. सत्ताधारी- विरोधक, पक्षीय-अपक्ष अशा सर्वच गटांनी शक्तिप्रदर्शन करत वातावरणात राजकीय रंग भरण्यात आला. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत, एबी अर्ज न मिळाल्याने काही उमेदवारांची धाकधूक वाढल्याचे दिसून आले होते; मात्र ज्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली, त्यांनी रॅली आणि ढोल-ताशांच्या गजरात प्रभाग समिती कार्यालये गाठली. बँड-बाजा पथक तसेच समर्थकांची मोठी गर्दी आणि विजयाच्या घोषणांनी संपूर्ण ठाणे शहर राजकीय रंगात न्हाऊन निघाले होते. अनेक उमेदवारांना शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांची धाकधूक वाढली होती. अर्ज भरण्याची मुदत संपण्यापूर्वी फॉर्म मिळताच कार्यकर्त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली.
कोर्टनाका परिसरात रात्रभर ‘जागा’
निवडणूक अर्जासोबत सादर कराव्या लागणाऱ्या सत्यप्रतिज्ञा पत्रासाठी कोर्टनाका परिसरात अभूतपूर्व गर्दी दिसून आली. उमेदवारांची निकड लक्षात घेऊन कोर्टनाका येथील नोटरी आणि रजिस्ट्रेशनची दुकाने सोमवारी रात्रभर सुरू होती. शपथपत्रासाठी वकील आणि नोटरींकडे उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे हा परिसर रात्रभर जागा होता.
दुपारी शांतता
बंडखोर उमेदवार महाविकास आघाडीकडे जाऊ नयेत, यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न झाले; मात्र तरीही मोठी गळती पाहायला मिळाली. भाजपने अनेक ठिकाणी जुन्या चेहऱ्यांऐवजी तरुण कार्यकर्त्यांना संधी दिल्याने पक्षात दोन गट पडल्याचे चित्र आहे. दुपारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर सकाळपासून गजबजलेल्या रस्त्यांवर अचानक शांतता पसरली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.