पनवेल रेल्वे स्थानकात गांजा बाळगणारा अटकेत
पनवेल, ता. ३० (वार्ताहर) : पनवेल रेल्वे स्थानकात ट्रव्हल्स बॅगेमध्ये गांजा लपवून घेऊन आलेल्या एका व्यक्तीला पनवेल रेल्वे पोलिसांनी रविवारी (ता. २८) अटक केली. सुरेंद्र सियाराम चौहान (वय ३४) असे त्याचे नाव आहे. रेल्वे पोलिसांनी त्याच्याकडून सहा किलो ३८५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. हा गांजा त्याने कुठून आणला? तसेच तो कुठे घेऊन जात होता. याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
रविवारी सकाळी पनवेल रेल्वे पोलिसांचे पथक स्थानकात गस्त घालत असताना, त्यांना फलाट क्र. ६/७ वर एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना निदर्शनास आली. गस्तीवरील पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेल्या ट्रॉली बॅगेची तपासणी केली असता, त्यात दोन खाकी रंगाच्या पिशवीमध्ये सहा किलो ३८५ ग्रॅम वजनाचा हिरव्या रंगाची फुले, फळे, बिया, पाने, ओलसर असलेला उग्र वासाचा गांजासदृश अमली पदार्थ आढळला. या गांजाची किंमत ४५,५०० रुपये इतकी आहे. पोलिसांनी गांजाबाबत चौहान याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याच्याकडे सापडलेला गांजा व मोबाईल फोन जप्त करून त्याला एनडीपीएस ॲक्टखाली अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली.