वाशी, ता. ३० (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. ३०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत होती. याच दिवशी महायुती तुटल्याची अधिकृत घोषणा झाल्याने नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट), भाजप, तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मंगळवारी स्वतंत्रपणे जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले.
सकाळपासूनच विविध प्रभागांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला होता. उमेदवारांनी ज्या-ज्या प्रभागांतून निवडणूक लढवत आहेत, त्या प्रभागातील मंदिर, बुद्धविहार आदी प्रार्थनास्थळांना भेट देऊन प्रचाराची सुरुवात केली. त्यानंतर समर्थक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत वाजत-गाजत मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल-ताशे, डीजेच्या तालावर नाचत, पक्षाचे झेंडे, फलक आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. अनेक ठिकाणी उमेदवारांच्या नावाच्या घोषणा, विजयाचे दावे आणि एकमेकांवर कुरघोडी करणारे नारे ऐकायला मिळाले. यामुळे संपूर्ण नवी मुंबईत निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे चित्र दिसून आले. महायुती तुटल्यानंतर सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर मैदानात उतरल्याने प्रत्येक प्रभागात चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवी मुंबईतील दिघा विभागात शिवसेना शिंदे गटाचे विजय चौगुले यांनी अर्ज भरण्यासाठी जाताना चिंचपाडापासून दिघापर्यंत डीजेवर वाजत-गाजत मिरवणूक काढत अर्ज दाखल केला. ऐरोलीमध्ये महाविकास आघाडीचे मनसेचे उमदेवार निलेश बाणखेले, भाजपचे उमदेवार अशोक पाटील, शिवसेना शिंदे गटाचे अनिकेत म्हात्रे यांनी प्रचार रॅली काढत अर्ज दाखल करण्यात आला. काही प्रभागांत तर एकाच परिसरात वेगवेगळ्या पक्षांच्या मिरवणुका एकाच वेळी निघाल्याने वातावरण अधिकच रंगतदार झाले होते. दरम्यान, संभाव्य कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन निवडणूक प्रशासन व पोलिस यंत्रणा सतर्क होती.
पोलिसांचा बंदोबस्त तैनात
मिरवणुका, गर्दी आणि ध्वनिक्षेपकांचा वापर यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निवडणूक नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांकडून सातत्याने पाहणी सुरू होती. अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांनी केलेले शक्तिप्रदर्शन हे येत्या काळातील प्रचाराचा ट्रेलर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता अर्जांची छाननी, माघार आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला वेग येणार असून नवी मुंबईतील निवडणूक रणधुमाळी अधिक तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.