पहिल्याच टप्प्यात रस्त्याला तडे
उधवा-तलासरी महामार्गाच्या कामाचा बोजवारा
तलासरी, ता. ३० (बातमीदार) ः उधवा ते तलासरी-संजान या अत्यंत महत्त्वाच्या महामार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे; मात्र उधवा नवापाडा परिसरात कामाच्या पहिल्याच टप्प्यात नवीन रस्त्याला मोठ्या प्रमाणात तडे व भेगा पडल्याचे समोर आले आहे. नवीन रस्ता वापरण्यापूर्वीच तडकल्याने ठेकेदाराच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या महिन्यापासून उधवा परिसरात काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. काही भागातील काम नुकतेच पूर्ण झाले असतानाच रस्त्यावर भेगा दिसू लागल्या आहेत. शासनाचा करोडो रुपयांचा निधी खर्च होऊनही जर कामाचा दर्जा असा असेल, तर हा रस्ता किती काळ टिकणार, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. या कामावर देखरेख ठेवणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचेही याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. केवळ निकृष्ट कामच नव्हे, तर कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सूचनाफलक, रेडियम रिबिन किंवा बॅरिकेड्स नसल्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. याबाबत ठेकेदाराला वारंवार सूचना देऊनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
------------------
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
रस्त्याला पडलेल्या भेगांमुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी आता या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी आणि रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पुन्हा करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उधवा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
------------------
रस्त्याचे काँक्रीटीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाच्या पद्धतीने होत आहे. काँक्रीटचे मिश्रणही निकृष्ट दर्जाचे वापरण्यात येत असून, खाली खडी व दगड न टाकता थेट मातीवर रोलर फिरवून त्यावर काँक्रीट टाकले जात आहे. त्यामुळे रस्त्यावर लहान-मोठ्या भेगा व तडे पडत आहेत. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून कंत्राटदारावर तत्काळ कारवाई करावी.
- देवराम कुरकुटे, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते
------------------
मोठ्या प्रमाणावर काँक्रीटीकरणाचे काम सुरू असताना काही ठिकाणी हलके तडे जातात; मात्र अशा ठिकाणी पुन्हा दुरुस्ती करून किंवा तो भाग काढून नव्याने काम करण्यात येणार आहे.
- गुलशन मीना, प्रकल्प व्यवस्थापक