महायुतीची नाराजांमुळे डोकेदुखी वाढली
ठाण्यात उमेदवारी नाकारल्याने अनेकांकडून संताप
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : महापलिका निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. पक्षात बंडाळी होऊ नये, यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनी जागावाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सोमवरी रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवत अखेरच्या क्षणी आघाडी आणि युतीच्या घोषणेनंतर एबी अर्जांचे वाटप करण्यात आले. यामध्ये शिवसेना शिंदे गटाने विद्यमान १४, तर भाजपने ४ नगरसेवकांना धक्का देत नव्या चेहऱ्यांना संधी दिली असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी एकनिष्ठ राहून काम करणाऱ्यांना डावलण्यात आल्याने महायुतीत नाराजांची फौज उभी राहिली आहे. तसेच या नाराजांनीदेखील शक्तिप्रदर्शन करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.
मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधी महायुतीतील नेत्यांनी ठाणे पालिका निवडणुकीसाठीची युतीची घोषणा करीत जागावाटपाचा फॉर्म्युलादेखील सांगून टाकला. त्यानंतर पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज मिळावा, यासाठी सोमवार सायंकाळपासूनच दोन्ही पक्षांमधील इच्छुक आणि त्यांचे समर्थक पक्ष कार्यालयांच्या परिसरात ठाण मांडून बसले होते.
ठाण्यातील भाजप उमेदवारांची पहिली यादी रविवारी रात्री उशिरा जाहीर होताच यादीत नाव नसलेल्या इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. प्रभाग क्रमांक १५मध्ये भाजपच्या माजी नगरसेविका वर्षा पाटील, सुवर्णा कांबळे, माजी नगरसेवक राजकुमार यादव यांचे नावच नव्हते. यामुळे त्यांच्यासह समर्थकांनी वर्तकनगर येथील भाजपाच्या विभागीय कार्यालयात मोठी गर्दी करीत घोषणाबाजी करीत कार्यालयात तोडफोड केली. तसेच आनंद आश्रम येथे शिवसेना शिंदे पक्षातील इच्छुकांची मोठी गर्दी जमली होती. उमेदवारी नाकारण्यात आल्याचे कळताच अनेक उमेदवारांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते नेत्यांच्या नावाने शंखनाद करताना दिसून आले. काहींनी पक्षाच्या पदाचे राजीनामे दिले.
.......................
शिंदे गटाने १४ नगरसेवकांना डावलले
ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) पक्षाने १४ विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये साधना जोशी, एकनाथ भोईर, पूर्वेश सरनाईक, आशा डोंगरे, मधुकर पावशे, भूषण भोईर, रुचिता मोरे, मनीषा कांबळे, प्रभा बोरीटकर, राजेंद्र साप्ते, मंगल कळंबे, प्रियांका पाटील, सुनीता मुंडे या विद्यमान नगसेवकांचा समावेश आहे. यातील रुचिता मोरे यांच्याऐवजी त्यांचे पती राजेश मोरे, एकनाथ भोईर यांच्याऐवजी त्यांच्या सुनेला, भूषण भोईर यांच्याऐवजी त्यांची पत्नी सपना भोईर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
.....................................
भाजपकडून चार जणांना धक्का
भाजपच्या माजी नगरसेविका कविता पाटील, केवलादेवी यादव, सुवर्णा कांबळे, दीपा गावंड या चार जणांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्या जागी विकास पाटील यांच्यासह नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
..........................
बंडाचे निशाण
ठाणे शहरातील शिवसेनेचा केंद्रबिंदू म्हणून टेंभीनाका परिसराकडे पाहिले जाते. या प्रभागातूनच तिकीट न मिळाल्याने शिंदे गटाचे शाखाप्रमुख यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. टेंभीनाका येथील प्रभागातून शिवसेना (शिंदे गट) पक्षातून माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, शाखाप्रमुख निखिल बडजुडे आणि विकास दाभाडे हे तिघे जण इच्छुक होते. पक्षाने कोकाटे यांना उमेदवारी देताच बडजुडे आणि दाभाडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
................
माझ्या आयुष्याची वाट लावली - मधुकर पावशे
शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर नाराज झालेल्या प्रभाग क्रमांक ३ मधील माजी नगरसेवक भूषण भोईर, मधुकर पावशे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. या वेळी अपक्ष म्हणून निवडून आलो होतो, तेव्हा नेते माझ्या घरी येत होते आणि आता त्यांनी मला उमेदवारी नाकारली आहे. आमच्या आयुष्याची वाट लावली आहे, अशी टीका नाराज माजी नगरसेवक मधुकर पावशे यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.