मुरलीधर दळवी : सकाळ वृत्तसेवा
मुरबाड, ता. ३१ : नव्याने तयार होत असलेल्या मुरबाड-कल्याण चौपदरी सिमेंट काँक्रीट रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांकडून लवकरच टोलवसुली करण्यात येणार आहे. त्यासाठी पोटगाव गावाजवळ टोल बॅरियर उभारण्याचे; तसेच इमारतीचे बांधकाम वेगाने सुरू झाले आहे. नववर्षात या ठिकाणी टोलवसुलीला सुरुवात होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. एकीकडे ठेकेदाराकडून टोलसाठी लगीनघाई सुरू असताना, या रस्त्यासाठी ज्यांच्या जमिनी संपादित झाल्या, त्यांना अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नाही, अशी तक्रार शेतकऱ्यांकडून होत आहे.
मुरबाड-कल्याण राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण व चौपदरीकरणाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. सध्या या कामामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि प्रचंड धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. तरीही भविष्यात मुरबाड-कल्याण प्रवास वेगवान व सुखकर होईल, या आशेवर मुरबाडमार्गे कल्याण व मुंबईकडे जाणारे प्रवासी हालअपेष्टा सहन करत आहेत. मात्र, प्रवास सुलभ होण्याच्या स्वप्नात टोलधाडीचा अडथळा निर्माण होत असल्याची भावना वाहनचालकांमध्ये व्यक्त होत आहे.
पुलांचे काम प्रगतीपथावर
दरम्यान, मुरबाड-कल्याण मार्गावर उल्हास नदीवरील पांजरापोळ येथील पूल, मुरबाड शहराजवळील मुरबाडी नदीवरील पूल; तसेच मुरबाड एसटी डेपोसमोरील उड्डाणपुलाचे काम सध्या सुरू आहे. ही सर्व कामे पुढील दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होतील, अशी अपेक्षा असून त्यानंतर या मार्गावरील वाहतूक विनाअडथळा सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मोबदल्याची प्रतीक्षा
कल्याण-माळशेज घाट निर्मल महामार्ग क्रमांक ६१ वर कल्याण तालुक्यातील पाचवा मैल ते माळशेज घाटापर्यंतच्या ५४ किलोमीटर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत मुरबाडपर्यंत रस्ता चौपदरी करण्यात येत आहे. त्यानंतर माळशेज घाटापर्यंत रस्त्याचे मजबुतीकरण व सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जमीन संपादनाबाबत १ नोव्हेंबर २०२३; तसेच ३ सप्टेंबर २०२४ मध्ये राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केल्या होत्या. या अधिसूचना प्रसिद्ध होण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या जमिनींवर ताबा घेऊन रुंदीकरणाचे काम सुरू केल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या जमिनींचा मोबदला अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. जमिनी सक्तीने संपादित केल्याच्या निषेधार्थ टोकावडे परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले होते. मात्र प्रशासनाने हस्तक्षेप करून आंदोलन शांत केल्याचे सांगितले जात आहे. तरीही नुकसानभरपाईचा प्रश्न अद्याप निकाली न निघाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी कायम आहे.
टोलमधून सवलत नाही?
मुरबाड-कल्याण महामार्गाचे कामाचा पूर्णत्वाचा दाखला ठेकेदाराला मिळाल्यानंतर शासकीय गॅजेटमध्ये टोल आकारणीबाबत प्रसिद्धी करण्यात येईल. या संदर्भातील आदेश केंद्र सरकारकडून दिले जाणार आहेत. स्थानिक नागरिकांना टोलमधून सवलत देण्याबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभाग मुरबाड पाचवा मैलचे अभियंता सविता सांगळे यांनी दिली.
निवाड्यानंतर मोबदला
मुरबाड-कल्याण महामार्गासाठी संपादन केलेल्या जमिनीचा निवाडा अद्याप जाहीर झालेला नाही. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर निवाडा घोषित करण्यात येईल. त्यानंतर शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिला जाईल, असे कल्याण प्रांताधिकारी अखिल पाटील यांनी सांगितले.
आमची जमीन संपादित करून तीन वर्षे पूर्ण होत आली आहेत, या जमिनीवर कंत्राटदाराने संमती न घेताच जबरदस्तीने काम सुरू केले. त्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यासाठी अत्यंत संथ गतीने प्रक्रिया सुरू आहे. आम्हाला लवकरात लवकर जमिनीचा मोबदला मिळावा अशी मागणी आहे.
- गजानन गायकर, शेतकरी, किशोर
मुरबाड : मुरबाड-कल्याण चौपदरी रस्त्यावर टोल आकारणीसाठी इमारत व अडथळ्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.