नववर्षात अपघातमुक्त प्रवासाचा संकल्प
पालघर एसटी विभागाचे ‘सुरक्षितता अभियान’
पालघर, ता. ३१ : नवीन वर्षाच्या स्वागतासोबतच पालघर एसटी विभागाने प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी कंबर कसली आहे. रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी १ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व बस आगारांमध्ये विशेष ‘सुरक्षितता अभियान’ राबवण्यात येणार आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
महिनाभर चालणाऱ्या या अभियानात चालक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रबोधनावर भर दिला जाणार आहे. पालघर, बोईसर, डहाणू, जव्हार, सफाळे आणि वाडा या सर्व आगारांमध्ये तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातील. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि स्थानिक सामाजिक संस्थांच्या सहकार्याने चालकांसाठी विशेष आरोग्य आणि दृष्टिदोष तपासणी शिबिरे घेतली जाणार आहेत.
अपघात टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांवर लक्ष ठेवण्यासाठी एसटीचे विशेष गस्त पथक तैनात असेल. अतिवेगाने बस चालवणे, लेनची शिस्त न पाळणे आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग करणाऱ्या चालकांवर विशेष नजर ठेवली जाईल. तसेच ज्या चालकांकडून यापूर्वी अपघात झाले आहेत, त्यांचे विशेष समुपदेशन करण्यात येईल.
अधिकाऱ्यांकडे आगारांचे ‘पालकत्व’
या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे पालघर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशिष्ट आगारांचे ‘पालकत्व’ देण्यात आले आहे. हे अधिकारी थेट कार्यशाळेत (Workshops) जाऊन बसची स्थिती, इंजिन, ब्रेक आणि स्टिअरिंगची तांत्रिक तपासणी करणार आहेत. प्रवाशांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे. पालघर विभागामार्फत हे अभियान अत्यंत प्रभावीपणे राबवले जाईल, जेणेकरून अपघात शून्यावर आणता येतील, अशी प्रतिक्रिया पालघरचे एसटीच्या विभाग नियंत्रकांनी दिली.
मुख्य वैशिष्ट्ये :
कालावधी : १ ते ३१ जानेवारी २०२६
सहभागी आगार : पालघर, बोईसर, डहाणू, जव्हार, सफाळे, वाडा
उपक्रम : आरोग्य तपासणी, तांत्रिक ऑडिट आणि जनजागृती फलक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.