घराणेशाहीचा सावट कायम
कल्याण-डोंबिवलीत ‘फॅमिली पॅनल’चा बोलबाला
शर्मिला वाळुंज ः सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३१ ः अंबरनाथ-बदलापूरमधील घराणेशाहीचा धडा घेतला असल्याचा दावा शिंदे गट आणि भाजपकडून केला जात असला, तरी कल्याण-डोंबिवलीत तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत घराणेशाहीचेच चित्र अधिक ठळकपणे समोर आले आहे. पती-पत्नी, आई-मुलगा, वडील-मुलगी, भाऊ-भाऊ, भाऊ-बहिण अशा नातेसंबंधातील उमेदवार थेट निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर काही आमदारांच्या मुलांनाही उमेदवारी देण्यात आल्याने जुने, निष्ठावान कार्यकर्ते डावलले गेल्याची खंत अनेकांच्या मनात आहे.
यंदा पहिल्यांदाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका पॅनेल पद्धतीने निवडणूक लढवत असल्याने, प्रत्येक प्रभागावर आपलेच वर्चस्व राहावे यासाठी सर्वच पक्षांनी कौटुंबिक ताकद पणाला लावल्याचे स्पष्ट होते. पॅनेलमधून चार उमेदवार असल्याने आपलाच पॅनल निवडून यावा या गणितातून अनेक इच्छुकांनी थेट घरातील नातेवाईकांचा समावेश करून प्रचार सुरू केला होता. आई-वडील-मुलगा, भाऊ-वहिनी, पती-पत्नी, काका-काकी-पुतण्या-सून अशा विविध ‘फॅमिली कॉम्बिनेशन’ची चर्चा प्रभागागणिक रंगली होती.
अंबरनाथ-कुळगाव-बदलापूर नगरपरिषद निवडणुकीतील ‘फॅमिली ड्रामा’नंतर, एका घरातून एकालाच किंवा फारतर दोघांनाच उमेदवारी दिली जाईल, असे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले होते. त्यातच शिंदे गट-भाजप युती होणार नाही, अशी चर्चा असल्याने अनेकांच्या आशा शेवटपर्यंत पल्लवीत होत्या. मात्र, वरिष्ठ पातळीवर युती जाहीर होताच, नेमके कोणाचे तिकीट कापले जाणार, याबाबत प्रचंड अनिश्चितता निर्माण झाली. घरातील दोन-तीन जणांसाठी तिकीट मिळावे, यासाठी वरिष्ठांच्या पायऱ्या झिजवण्याचे प्रकारही उघडपणे पाहायला मिळाले. प्रत्यक्षात, मात्र युतीच्या गणितात काही ठिकाणी दोन उमेदवारांना संधी देत तोल सांभाळण्यात आला. डोंबिवलीत एका उमेदवारासाठी भाजपने हात सैल सोडल्याचे चित्र दिसले, तर मनसेने इनकमिंगवर भर देत ‘पाहिजे त्याला तिकीट’ अशी भूमिका घेतल्याची चर्चा आहे. घराणेशाही टाळण्याचे दावे आणि प्रत्यक्षातील तिकीट वाटप यातील विसंगतीमुळे, कल्याण-डोंबिवलीतील ही निवडणूक केवळ राजकीय लढत न राहता ‘फॅमिली फाईट’ ठरणार, हे मात्र आता स्पष्ट होत आहे.
भाजपातील घराणेशाही
डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथील दिपेश यांचे भाऊ जयेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे सेनेतून भाजपात गेलेले महेश पाटील आणि त्यांची बहीण डॉ. सुनिता पाटील हे रिंगणात आहेत. ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजित थरवळ यांना उमेदवारी मिळाली आहे. मनसेतून भाजपात आलेले प्रदीप चौधरी यांच्या पत्नी शारदा चौधरी यांनाही तिकीट देण्यात आले आहे.
शिंदे गटातील चित्र
भाजपातून शिंदे गटात गेलेले विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी कविता म्हात्रे हे दोघेही निवडणूक लढवत आहेत. राजन मराठे यांची पत्नी ज्योती मराठे आणि मुलगा सुरज मराठे रिंगणात आहेत. कल्याणमधील शिवसेनेचे रवि पाटील यांची बहीण प्रमिला पाटील, अरविंद मोरे यांच्या पत्नी अस्मिता मोरे तसेच संजय-निलिमा पाटील हे पती-पत्नी उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत.
मनसेची ‘फॅमिली एंट्री’
भाजपातून उमेदवारी न मिळाल्याने शैलेश धात्रक यांनी मनसेत प्रवेश करत स्वतःसह पत्नी मनिषा आणि मुलगी पूजा यांनाही रिंगणात उतरवले. संदेश पाटील-रसिका पाटील, तकदीर-योगिता काळण, योगेश-वैशाली पाटील, सुनील-स्नेहा राणे अशा जोड्यांनाही तिकीट मिळाले आहे. वडील-मुलगी नात्यातील जयंता पाटील-काजल पाटील आणि प्रल्हाद म्हात्रे-ॲड. वेदांगी म्हात्रे यांचाही समावेश आहे.
इतर पक्षांतील नातेवाईक
राष्ट्रवादी (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचा मुलगा विक्रांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आमदारांच्या नातेवाईकांना संधी
कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांचा मुलगा हर्षल मोरे याला तिकीट देण्यात आले. आमदार झाल्यानंतर ‘आता आपली संधी येईल’ अशी अपेक्षा ठेवणाऱ्या काही जुन्या कार्यकर्त्यांना मात्र शेवटच्या क्षणी मोठा धक्का बसला. राजन मराठे यांच्या घरात दोन तिकीटे आणि मोरे यांच्या मुलाला उमेदवारी मिळाल्याने, संधी हुकलेल्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हतबलता स्पष्ट दिसत होती. कल्याण पूर्वेत आमदार सुलभा गायकवाड यांच्या जाऊबाई मनिषा अभिमन्यू गायकवाड, तर भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पत्नी हेमा पवार यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.