पनवेल, ता. ३१ (बातमीदार) : महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे; मात्र समाजमाध्यमांच्या विविध व्यासपीठांवरून आचारसंहितेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. या माध्यमांवर प्रचाराचे व्हिडिओ, रील्स पोस्ट करण्यापूर्वी त्याची परवानगी निवडणूक विभागाकडून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे; मात्र प्रत्यक्षात कोणत्याही परवानगीशिवाय सर्रास उमेदवारांचा सोशल मीडियाद्वारे प्रचार सुरू झाला आहे.
मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यम हे सर्वात जास्त प्रभावी ठरले आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच इच्छुकांनी आपल्या कामाचे व्हिडिओ, रिल्स व्हायरल करण्याचा धडाका लावला होता; मात्र निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. या काळात फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आणि ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) यांसारख्या सोशल मीडियाद्वारे प्रचार करण्यापूर्वी प्रमाण व संनियंत्रण समितीकडे अर्ज करणे अनिवार्य करण्यात आले. या अर्जाद्वारे संबंधित व्हिडिओ समितीला पाठवून समितीने त्यात सुचविलेले बदल करूनच तो समाजमाध्यमांवर अपलोड करणे अपेक्षित आहे; मात्र सध्या असे होताना दिसत नाही.
निवडणूक वेळापत्रकानुसार मंगळवारी (ता. ३०) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवसापर्यंत उमेदवारी कोणाला मिळणार, युती किंवा आघाडी होणार का, एबी फॉर्म मिळणार का, हा तिढा सुरू होता; मात्र प्रत्यक्षात अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरून आपला प्रचारही सुरू केला. त्यामुळे या उमेदवारांनी समाजमाध्यमांवरील आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट आहे.
निवडणूक विभागाकडून लक्ष
निवडणूक विभागाकडून समाजमाध्यमांवर व्हिडिओ पोस्ट करण्यापूर्वी संबंधित समितीकडून परवानगी घेणे गरजेचे आहे. व्हिडिओमधील मजकूर आक्षेपार्ह आढळल्यास आचारसंहिता कक्षाकडून कारवाई करण्यात येणार आहे. ऑनलाइनवर व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी येणाऱ्या खर्चाची माहिती देणे गरजेचे आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर ही माहिती मागवली जाणार आहे.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर आम्ही एक समिती स्थापन करून त्याद्वारे सर्वच माध्यमांवर लक्ष ठेवून आहोत. अंतिम उमेदवारी जाहीर होईल, तेव्हा त्या उमेदवाराने व्हायरल प्रचार साहित्याची माहिती आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे देऊ. समाजमाध्यमावर केल्या जाणाऱ्या खर्चाची माहिती उमेदवाराने देणे आवश्यक आहे. समाजमाध्यमावर आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
- नानासाहेब कामटे, अतिरिक्त आयुक्त, पनवेल महापालिका