नवीन वर्षात कर्करुग्णांना दिलासा
टाटा मेमोरियलमध्ये पायाभूत सुविधांची भर; २०२६ पर्यंत महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण होणार
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : देशातील अग्रगण्य कर्करोग उपचार संस्था असलेल्या टाटा मेमोरियल सेंटर (टीएमसी)अंतर्गत कर्करुग्णांच्या सेवांसाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारणीचे काम सुरू आहे. अणुऊर्जा विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या या संस्थेला अणुऊर्जा आयोगाकडून (एईसी) २०२६ पर्यंत विविध महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
२०२६ मधील महत्त्वाचे प्रकल्प
खारघर येथील अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (ॲक्ट्रेक) येथे विद्यार्थी, संशोधक आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांसाठी निवासी वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रकल्प कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीतून राबवला जाणार आहे. याशिवाय उत्तर प्रदेश आणि लगतच्या राज्यांतील कर्करुग्णांची वाढती गरज लक्षात घेता वाराणसी येथील टाटा मेमोरियल रुग्णालयाचा विस्तार आणि सक्षमीकरण करण्यात येणार आहे.
कर्करोग प्रसार अभ्यास केंद्राचा विस्तार
लोकसंख्याआधारित कर्करोग नोंदणी अधिक मजबूत करणे आणि राष्ट्रीय पातळीवर कर्करोग संशोधनासाठी सक्षम व्यासपीठ उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. वाराणसी रुग्णालय आणि सीसीई हे प्रकल्प अणुऊर्जा विभागाकडून आर्थिक मंजुरी मिळाल्यानंतर राबवले जाणार असून, त्याबाबतचे प्रस्ताव सध्या डीएईकडे सादर करण्यात आले आहेत.
परळ येथील रुग्णालयात ओपीडी विस्तार
छाती व मूत्रविकार कर्करोगांसाठी तसेच पॅलिएटिव्ह केअर आणि मानसोपचार सेवांसाठी सुमारे १० हजार चौरस फुटांचा सामान्य ओपीडी विस्तारण्यात येणार आहे. पॅलिएटिव्ह केअर आणि मानसोपचारासाठी स्वतंत्र ओपीडी असणार असून, हा विस्तार सर्वसमावेशक व बहुवैद्यकीय उपचार पद्धतीला पूरक ठरणार आहे.
७० खाटांच्या सर्वसाधारण पुरुष रुग्ण वॉर्डचे नूतनीकरण
सुमारे ७,५०० चौरस फुटांच्या या वॉर्डचे नूतनीकरण सुरू असून, वैद्यकीय उपकरणे, फर्निचर आणि इतर सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प २०२६च्या पहिल्या तिमाहीत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
२०२५ मध्ये सुरू झालेले प्रकल्प
* टाटा मेमोरियल रुग्णालय, परळ :
- २०२५मध्ये वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून सामान्य ओपीडीचा विस्तार करण्यात आला. यामध्ये जठरांत्र कर्करोगासाठी स्वतंत्र ओपीडी सुरू करण्यात आली.
– निदान व उपचारपूर्व तपासणीसाठी अत्याधुनिक पल्मोनरी फंक्शन टेस्ट (पीएफटी) प्रयोगशाळेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
- सुमारे १० हजार चौरस फुटांचा हा ओपीडी विस्तार सप्टेंबर २०२५मध्ये कार्यान्वित झाला.
* ॲक्ट्रेक, खारघर :
- इंटिग्रेटेड रेडिएशन ऑन्कोलॉजी सेंटर (आयआरओसी)
रेडिओथेरपी विभागासाठी १२ मजली इमारत उभारली जात असून, येथे १२ लीनियर अॅक्सिलरेटर यंत्रणा असणार आहे. त्यामुळे रेडिएशन उपचारांचा प्रतीक्षा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. हा प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
- सुपरस्पेशालिटी ओपीडी ब्लॉक
१२ मजली बहुविशेषज्ञ ओपीडी ब्लॉकचे बांधकाम सुरू असून, कर्करोगासोबत येणाऱ्या वयपरत्वे आजार तसेच केमोथेरपीमुळे उद्भवणाऱ्या फुप्फुस, हृदय व मूत्रपिंडविकारांवर उपचार करण्यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. हा प्रकल्पही २०२७मध्ये कार्यान्वित होणार आहे. २०२५मध्ये प्रोटॉन थेरपी सुरू झाल्यानंतर जानेवारी ते नोव्हेंबर २०२५दरम्यान ४५९ नव्या रुग्णांवर उपचार सुरू झाले. आतापर्यंत एकूण ४,५७२ रुग्णांनी प्रोटॉन थेरपी उपचार पूर्ण केले आहेत.
खारघर केंद्रात सुरू झालेल्या नवीन सुविधा
मानसोपचार ओपीडी, ऑडिओलॉजी ओपीडी, जेरियाट्रिक (ज्येष्ठ नागरिक) ओपीडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.