‘फिट मेंदू’ हा आरोग्याचा पाया
तज्ज्ञ डॉक्टरांचे मत; नवीन वर्षात निरोगी राहण्याचा संकल्प
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : नवीन वर्षात केवळ शारीरिक तंदुरुस्ती राखणे गरजेचे नाही; तर शरीरासोबत मेंदूचे आरोग्य जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सततचा ताण, अपुरी झोप, मोबाईल व स्क्रीनचा अतिवापर यामुळे स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. त्यामुळे नवीन वर्षात दररोज चांगली आणि पुरेशी झोप, ध्यान-प्राणायाम, वाचन, हलका व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे मेंदू सक्रिय व निरोगी राहतो. विस्मरण, डोकेदुखी, चक्कर येणे किंवा झोपेच्या समस्या दुर्लक्षित न करता वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नवीन वर्षात ‘फिट मेंदू’ हा आरोग्याचा पाया ठरू शकतो, असे मत न्यूरोसर्जन व्यक्त करतात.
नवीन वर्षात फिट राहण्यासाठी व्यायामात विविधता आणा (चालणे, धावणे, योग, दोरीउड्या), संतुलित आहार घ्या (प्रथिने, कर्बोदके, फळे, भाज्या), पुरेसे पाणी प्या, पुरेशी झोप घ्या आणि त्यात सातत्य ठेवा. त्यामुळे तुम्हाला ऊर्जावान आणि निरोगी राहण्यास मदत होईल, असा सल्ला दिला जात आहे.
भरपूर पाणी प्या, त्यामुळे दिवसभर शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखली जाईल. संतुलित आहार घ्या. प्रथिने, कर्बोदके, आरोग्यदायी स्निग्ध पदार्थ, फळे आणि भाज्या यांचा आहारात समावेश करा. जेवणाची वेळ निश्चित करा. सायंकाळी ७ वाजल्यानंतर जड जेवण टाळा. प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. सॉस आणि चिप्स टाळा, त्याऐवजी घरी बनवलेली चटणी खा, असा सल्ला न्यूरोसर्जन यांनी दिला.
दररोज १५ ते ३० मिनिटे चाला किंवा हळू धावा. दोरीउड्या मारा. योगा आणि स्ट्रेचिंग करा. लवचिकता आणि मनःशांतीसाठी त्याचा उपयोग होतो. स्नायू बळकट करण्यासाठी पुशअप्स आणि बैठका मारा. १० ते १५ मिनिटे व्यायाम करा. दररोज सात ते आठ तास झोप घ्या. शरीराला रिकव्हर होण्यासाठी विश्रांतीचे दिवसही महत्त्वाचे असतात. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि छोट्या यशाचा आनंद साजरा करा, असा सल्ला न्यूरोसर्जन यांनी दिला.
अचानक जड व्यायाम किंवा चुकीच्या पद्धतीने केलेल्या व्यायामामुळे सांधे व स्नायूंना इजा होऊ शकते. नियमित चालणे, स्ट्रेचिंग, योग आणि हलका व्यायाम यामुळे सांधेदुखी कमी होते व हालचाल क्षमता टिकून राहते. वयोमानानुसार व शरीराच्या क्षमतेनुसारच व्यायामाचे वेळापत्रक ठरवावे. कोणतीही वेदना किंवा त्रास जाणवत असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
- डॉ. निळकंठ धामणसकर, अस्थिरोगतज्ज्ञ
नवीन वर्ष हे आरोग्य सुधारण्यासाठी योग्य संधी असते. बदललेल्या जीवनशैलीमुळे हृदयरोगांचे प्रमाण वाढत आहे; मात्र योग्य सवयी अंगीकारल्यास ते टाळता येऊ शकते. दररोज किमान ३० मिनिटे चालणे, संतुलित व कमी मीठ-तेल असलेला आहार घेणे, धूम्रपान व मद्यपान टाळणे आणि ताणतणाव नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रक्तदाब, मधुमेह व कोलेस्ट्रॉलची नियमित तपासणी करून हृदयाचे आरोग्य तपासणे गरजेचे आहे. नवीन वर्षात निरोगी हृदय हीच खरी गुंतवणूक ठरू शकते.
- डॉ. राहुल गुप्ता, संचालक, इंटरवेशनल कार्डिओलॉजी
अशी घ्या त्वचेची काळजी
नवीन वर्षात निरोगी व तेजस्वी त्वचेसाठी योग्य काळजी घेण्याचे आवाहन त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. पूजा गोलवाड यांनी केले आहे. दिवसाची सुरुवात सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ करण्यापासून करावी. त्वचा मऊ करणारे तेल/क्रीम वापरणे आवश्यक आहे. त्वचा सामान्य असली हे तेल किंवा क्रीम त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. उन्हात घराबाहेर पडण्यापूर्वी सूर्यापासून त्वचेचे रक्षण करणारे लोशन वापरणे गरजेचे आहे. सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच नव्हे, तर वर्षभर वापरणे गरजेचे आहे. निरोगी त्वचेसाठी जीवनशैली महत्त्वाची आहे. दररोज पुरेसे पाणी पिणे गरजेचे असल्याचे डॉ. पूजा गोलवाड सांगतात.