राष्ट्रवादीची मतांची टक्केवारी घसरली
भक्कम विजय असूनही पक्षांतर्गत गद्दारी ठरली डोकेदुखी
रोहा, ता. ३१ (बातमीदार) : रोहा अष्टमी नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने नगराध्यक्षपदासह २० पैकी तब्बल १८ जागांवर दणदणीत विजय मिळवला. मात्र अनेक प्रभागांत झालेली पक्षांतर्गत गद्दारी आणि त्यामुळे घसरलेली मतांची टक्केवारी, या घवघवीत यशामागे पक्षासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
निवडून आलेल्या १८ नगरसेवकांपैकी जवळपास निम्म्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली आहेत. तसेच प्रभाग क्रमांक ९ मधील दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचा पराभव झाल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शहरातील एकूण १० प्रभागांपैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता अनेक प्रभागांमध्ये राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षातील उमेदवारांना पाडण्यासाठी उघडपणे प्रयत्न केल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. परिणामी बलाढ्य मानल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची एकूण मतांची टक्केवारी लक्षणीयरीत्या घसरल्याचे चित्र दिसून आले आहे. या निवडणुकीत रोहा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिंदे गटाची शिवसेना-भाजप युती अशी थेट लढत पाहायला मिळाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आय आणि काही अपक्षांनी स्वतंत्र आघाडी उभारली होती. प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादीचे मातब्बर नेते समीर सकपाळ तसेच महिला उमेदवार अश्विनी राकेश पवार यांचा अत्यंत निसटता पराभव झाला. या प्रभागात शिवसेना-भाजप युतीने खाते उघडत राष्ट्रवादीला जोरदार हिसका दाखवला. स्थानिक पातळीवरील गद्दारीमुळे समीर सकपाळ यांच्यासारख्या उमद्या नेत्याला पराभव पत्करावा लागल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
..........
इच्छुकांची संख्या सर्वाधिक
इतर ९-१० प्रभागांत राष्ट्रवादीचे काही उमेदवार केवळ १०० ते १५० मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. प्रत्यक्षात हे उमेदवार ५०० पेक्षा अधिक मतांनी निवडून आले असते; मात्र अंतर्गत नाराजी, चुकीची उमेदवार निवड आणि इच्छुकांची गर्दी याचा परिणाम पक्षाला सहन करावा लागला. नऊ वर्षांनंतर निवडणुका झाल्याने इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी होती. उमेदवारी न मिळाल्याने काही नाराज कार्यकर्त्यांनी थेट पक्षाशी गद्दारी करीत पाडापाडीचे राजकारण केल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर पराभूत उमेदवारांना स्वीकारलेले नगरसेवक म्हणून संधी देऊन सन्मानित करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.