सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३१ : नवी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती फिस्कटल्यानंतर दोन्ही पक्षांनी १११ जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. अनेकांनी मर्जीतील उमेदवारांना संधी दिल्यामुळे बंडखोरांचे प्रमाण वाढले आहे. आज (ता. ३१) सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पातळ्यांवर या अपक्ष अर्ज भरलेल्या बंडखोरांसोबत चर्चेची गुऱ्हाळे दिवसभर सुरू होती.
नवी मुंबईत शिंदे गट आणि भाजप यांच्यापुढे दिघा, ऐरोली, घणसोली, वाशी, नेरूळ, जुईनगर या भागात बंडखोरांनी उमेदवारी अर्ज भरून आव्हान दिले आहे, तर अशीच परिस्थिती पनवेल महापालिकेच्या निवडणुकीतही झालेली दिसते. या भागात शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट, रिपाइं आणि भाजप यांनी महायुती केली आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांचे पत्ते कापले गेले आहेत. अशा परिस्थितीत पक्षाला धडा शिकवण्यासाठी कामोठे, खारघर, कळंबोली, पनवेल या भागांत अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदे सेनेच्या बंडखोर उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरले आहेत.
नवी मुंबई महापालिकेतील १११ जागांसाठी सुमारे एक हजार उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. यात २२२ उमेदवार शिवसेना आणि भाजपतर्फे आले आहेत, तर उर्वरित महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. यापैकी सुमारे ६०० उमेदवार अपक्ष निवडणूक लढवित आहेत. या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिवसभर धावपळ करावी लागत आहे. अनेक ठिकाणी पक्षातर्फे स्वीकृत नगरसेवक आणि इतर तदर्थ समित्यांचे आश्वासन देऊन बोलणी केली जात आहेत.
तांत्रिक कारणांमुळे अर्ज बाद
नवी मुंबईत भाजपच्या बंडखोरांनी भरलेले १३ पेक्षा अधिक अपक्ष अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद ठरले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या अपक्ष बंडखोरांचे अर्ज कागदपत्रांअभावी बाद करण्यात आले.
संध्याकाळपर्यंत मनधरणीचे प्रयत्न
पनवेल महापालिका निवडणुकीत खारघर, कामोठे आणि कळंबोली या भागांत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज भरला आहे. अशा नाराज पदाधिकाऱ्यांसोबत बोलणी करीत मनधरणी करण्याचे काम संध्याकाळपर्यंत सुरू होते.
बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्यांना सुरुवातीला विनंती करू. अपक्ष अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांनी केलेल्या अर्जामुळे भाजप आणि महायुतीच्या मतांवर किती परिणाम होईल, हा प्रश्न नंतरचा आहे. पण विनंतीला मान देऊन काही जण माघार घेतील, अशी अपेक्षा आहे.
- प्रशांत ठाकूर, भाजप आमदार, पनवेल
भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. अशा लोकांसोबत आम्ही चर्चा करीत आहोत. ज्यांचे अर्ज बाद झाले त्यांचा विषय नाही. ज्यांचे अर्ज बाद होणार नाहीत व शेवटपर्यंत ठेवत असतील अशा पदाधिकाऱ्यांची आम्ही मनधरणी करून अर्ज मागे घ्यायला लावू. ते भाजपचेच आहेत. कोणी बंडखोर राहणार नाही.
- डॉ. संजीव नाईक, नवी मुंबई निवडणूक प्रभारी, भाजप
नवी मुंबईमधील बंडखोर उमेदवार
प्रभाग क्रमांक १
रिंकू यादव (भाजप), नारायणकर (ठाकरे गट), प्रथमेश आरुटे, विजय लिलके (शिंदे गट)
प्रभाग क्रमांक ३
शीतल शिंदे (भाजप), संजू वाडे (शिंदे गट), शाम कोटकर (भाजप), वैशाली पाटील (भाजप)
प्रभाग क्रमांक ५
साहील चौगुले (शिंदे गट), अशोक तावडे, मोहन सोमवंशी, जया औरदे-पाटील
पनवेलमधील बंडखोर उमेदवार
प्रभाग क्रमांक ८
विजय भोईर
प्रभाग क्रमांक ४
नेत्रा पाटील (भाजप), किरण पाटील, रिना पाटील
प्रभाग क्रमांक ६
नीलेश बाविस्कर, यशोदा गायकवाड (ठाकरे गट)
कामोठे प्रभाग - ११
सनी सखाराम पाटील (शेकाप), चंद्रकांत नवले (शरद पवार गट)
कामोठे प्रभाग - १२
सुलक्षणा जगदाळे (शिंदे गट), आशीष कदम (रिपाइं आठवले गट)
खांदा कॉलनी प्रभाग - १५
शिवाजी थोरवे (शिंदे गट)
नवीन पनवेल प्रभाग १६
अंकुर पाटील (मनसे), मल्लिनाथ गायकवाड (काँग्रेस)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.