शीतल मोरे : सकाळ वृत्तसेवा
अंबरनाथ, ता. ३१ : सरते वर्ष अंबरनाथ शहरासाठी विकासकामे आणि मोठ्या राजकीय बदलांचे ठरले. शहरातील तब्बल ८५ टक्के रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला, तर उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. सोबतच नाट्यगृह, प्रशासकीय इमारत, कनिष्ठ न्यायालय, वैद्यकीय महाविद्यालय, यूपीएससी-एमपीएससी भवन, अंबरनाथ रेल्वे होम प्लॅटफॉर्म, ऐतिहासिक शिवमंदिराचे सुशोभीकरण, जलजीवन मिशनअंतर्गत पाण्याच्या टाक्या, स्पेनच्या धर्तीवरील एकत्रित घनकचरा प्रकल्प, इंडोर स्टेडियम आणि शूटिंग रेंज अशा कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांनी शहराच्या विकासाला वेग दिला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अनेक विकास प्रकल्प मार्गी लागले असून, काही प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. २०२५ मध्ये पालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीतून कामकाजाला सुरुवात झाली. सुमारे ४० कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या या इमारतीचे सुमारे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित दोन मजल्यांचे काम सुरू आहे. ऐतिहासिक शिवमंदिराचे सुशोभीकरण १३८ कोटी रुपयांच्या निधीतून प्रगतीपथावर आहे. तसेच स्पेनच्या धर्तीवरील अंबरनाथ-बदलापूर एकत्रित घनकचरा प्रकल्प सुमारे ८० टक्के पूर्ण झाला आहे.
सरते वर्ष विकासाची भक्कम पायाभरणी करून गेले असताना, नव्या वर्षात सत्ताबदलातून अपेक्षांचा नवा अध्याय सुरू झाला आहे. सुरू असलेली विकासकामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण व्हावीत, रखडलेले प्रकल्प तातडीने मार्गी लागावेत, भ्रष्टाचाराला पूर्ण आळा बसावा आणि पारदर्शक कारभार दिसावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य व वाहतूक या मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष देत, सर्वसामान्यांशी थेट संवाद साधणारे उत्तरदायी नेतृत्व मिळावे, हीच अंबरनाथकरांची नव्या नगराध्यक्षांकडून अपेक्षा आहे.
रसिकांच्या सेवेत नाट्यगृह
शहराच्या सांस्कृतिक जीवनाला चालना देणारे नाट्यगृह अखेर सरत्या वर्षात नागरिकांच्या सेवेत आले. सुमारे ३८.७१ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या नाट्यगृहाचे उद्घाटन १९ ऑक्टोबरला ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटनानंतर मोफत नाट्यप्रयोगांची पर्वणी नाट्यरसिकांना मिळाली असून हाऊसफुल्ल प्रतिसाद लाभला.
तहान भागणार
सर्वोदय नगरसाठी २० लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी ९५ टक्के पूर्णत्वास आली असून नाळिंबी येथील उल्हासनदीवर २५८ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणारा जलकुंभ पूर्ण झाल्यानंतर शहराला सुमारे ९० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे पुढील ५० वर्षांचा पाणीपुरवठा सुरक्षित होईल, असा दावा करण्यात आला आहे.
राजकीय उलथापालथ
विकासाच्या पार्श्वभूमीवरच शहरात मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात तब्बल २५ वर्षांनंतर भाजपचे कमळ फुलले. थेट जनतेतून झालेल्या निवडणुकीत तेजश्री करंजुळे पाटील यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. २००५ नंतर पुन्हा एकदा करंजुळे कुटुंबाला जनतेने संधी दिली. नव्या वर्षात त्या पदभार स्वीकारणार असून “ना खाणार, ना खाऊन देणार” अशी भूमिका जाहीर करत त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात ठाम भूमिका मांडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.