आधुनिक युगातही पाटा-वरवंट्याची ‘चव’ कायम
म्हसा यात्रेत दगडी कारागिरांची लगबग
सुधाकर वाघ : सकाळ वृत्तसेवा
टोकावडे, ता. १ ः तंत्रज्ञानाच्या युगात मिक्सर आणि ग्राइंडरने स्वयंपाकघरात जागा मिळवली असली, तरी ग्रामीण भागात आजही पाटा-वरवंट्याची परंपरा टिकून आहे. मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध म्हसा यात्रेच्या निमित्ताने हे पारंपरिक दगडी साहित्य घडवणाऱ्या कारागिरांना मोठा रोजगार उपलब्ध झाला असून, यात्रेच्या बाजारपेठेत पाटा-वरवंटा आणि जात्यांची मोठी आवक झाली आहे. मुरबाडची ओळख असलेली पौराणिक आणि श्रद्धेची म्हसा यात्रा ३ जानेवारी (पौष पौर्णिमा)पासून सुरू होत आहे. या यात्रेनिमित्त केवळ धार्मिक विधीच नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळते. यात्रेत विविध प्रांतांतून कारागीर आपल्या कलाकृती घेऊन दाखल झाले आहेत.
दगडातून पाटा, वरवंटा, जातं किंवा खलबत्ता घडवणे, हे अत्यंत कौशल्याचे आणि मेहनतीचे काम आहे. योग्य दगड निवडण्यापासून ते घणाच्या घावांनी त्याला आकार देईपर्यंत अनेक दिवसांची मेहनत लागते. मिक्सरच्या तुलनेत पाट्यावर वाटलेल्या मसाल्याची चव अधिक चांगली लागते, ही धारणा आजही ग्रामीण भागात कायम असल्याने या वस्तूंना मागणी टिकून आहे.
दगडात जीव ओतून पाटा-वरवंटा किंवा खलबत्ता घडवणे हे अत्यंत कष्टाचे आणि वेळखाऊ काम आहे. योग्य दगडाची निवड, त्यावर घणाच्या साहाय्याने आकार देणे, गुळगुळीत पृष्ठभाग तयार करणे यासाठी अनेक दिवस लागतात. प्लॅस्टिक, मिक्सर आणि आधुनिक साधनांच्या वाढत्या वापरामुळे या कलेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे; मात्र ग्रामीण स्वयंपाकघरात आजही दगडी पाट्यावर वाटलेले मसाले अधिक चवदार लागतात, अशी ठाम धारणा असल्याने अनेक कुटुंबे आजही या साधनांना प्राधान्य देतात.
म्हसा यात्रेच्या काळात या कारागिरांना वर्षभराच्या उदरनिर्वाहाची मोठी संधी मिळते. अनेक कारागीर कुटुंबासह मुरबाडमध्ये दाखल होऊन तात्पुरती दुकाने थाटतात आणि वर्षभर तयार केलेली उत्पादने विक्रीस ठेवतात; मात्र वाढती महागाई, कच्च्या दगडाचा खर्च, वाहतूक आणि मर्यादित विक्रीमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
आव्हानांच्या गर्तेत पारंपरिक कला
एकीकडे आधुनिकता आणि दुसरीकडे वाढती महागाई, कच्च्या दगडाचा खर्च व वाहतूक खर्च यामुळे हे कारागीर अडचणीत सापडले आहेत. मिक्सर आणि घरघंटीमुळे जात्यांचा वापर कमी झाला असला, तरी काही हौशी ग्राहक शोभेच्या वस्तू म्हणून या साहित्याची खरेदी करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.