ज्यांच्याशी वाद, त्यांच्याच सोबत रणनीती!
डोंबिवली पश्चिमेत पॅनल २२ मधील ‘राजकीय गणित’ उघड
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३१ ः डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्रमांक २२ मध्ये सध्या राजकारणाचा रंग अधिकच गडद झाला आहे. ज्यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली, टीका केली. त्यांच्याच सोबत आता निवडणुकीची रणनीती आखावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. शिंदे गटाच्या उमेदवार विकास म्हात्रे हे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासोबत बसून पॅनलमधील निवडणूक रणनीतीवर चर्चा करत असल्याचे फोटो सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
प्रभाग क्रमांक २२ मध्ये शिवसेनेकडून विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून प्रकाश भोईर आणि अश्विनी म्हात्रे रिंगणात आहेत. याच प्रभागात दोन्ही ठाकरेंच्या गटांकडूनही उमेदवार उभे ठाकले आहेत. त्यातच शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने मनसेत प्रवेश करून उमेदवारी घेतल्याने आणि बाळा म्हात्रे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने लढत अधिकच तगडी झाली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीला फटका बसू नये, मतांची फाटाफूट टाळावी, यासाठी विकास म्हात्रे यांना अखेर रविंद्र चव्हाण यांच्यासोबत जुळवून घ्यावे लागल्याची चर्चा आहे. चव्हाण यांच्यासोबत बसून रणनीती आखतानाचे फोटो व्हायरल होताच, विकास म्हात्रे यांनी अखेर नमते घेतले का? असा सवाल राजकीय चर्चांमध्ये विचारला जात आहे.
डोंबिवली पश्चिमेतील ही घडामोड पुन्हा एकदा अधोरेखित करते की राजकारणात ना कोणी कायमचा शत्रू असतो, ना कोणी कायमचा मित्र. कालचे विरोधक आज एकत्र बसतात आणि निवडणुकीचे गणित नव्याने मांडले जाते. पॅनल २२ मधील ही ‘जुळवाजुळव’ महायुतीसाठी किती फायदेशीर ठरणार, हे मात्र निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
भाजपला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश
वॉर्डात ‘विकास होत नाही, विकासासाठी निधी मिळत नाही’ असा ठपका ठेवत विकास म्हात्रे यांनी यापूर्वी भाजपच्या वरिष्ठांवर नेम साधला होता. त्यानंतर त्यांनी भाजपला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशानंतर भाजप आणि शिंदे गट यांच्यातील स्थानिक पातळीवरील राजकारण चांगलेच तापले होते. मात्र, महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचा निर्णय अंतिम झाल्यानंतर हे चित्र हळूहळू बदलू लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.