श्री मलंगगडावर भक्तीचा महोत्सव
२९ जानेवारीपासून यात्रेला सुरुवात; कडेकोट बंदोबस्तात प्रशासकीय तयारी पूर्ण
अंबरनाथ, ता. १ (वार्ताहर) : अंबरनाथ तालुक्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाच्या श्री मलंगगड (मच्छिंद्रनाथ) यात्रेचा बिगुल वाजला आहे. २९ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या या उत्सवासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी उल्हासनगर प्रांत कार्यालयात सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा आणि पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी १,२०० पोलिस कर्मचारी, एसआरपीएफच्या तुकड्या आणि गोपनीय पथके गडावर आणि पायथ्याशी तैनात असतील. समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि शांतता राखली जावी, यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पायी चढाईच्या मार्गावर ठिकठिकाणी आरोग्य पथके तैनात करण्यात येणार आहेत. या बैठकीत सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी, नायब तहसीलदार दीपक अनारे, अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने, पोलिस निरीक्षक उमेश सावंत तसेच विश्वस्त चंद्रहास केतकर, रोहन पाटील यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
व्हीआयपी भेटींमुळे गर्दीचा अंदाज
दरवर्षीप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दर्शनासाठी येण्याची दाट शक्यता आहे. यामुळे गडावर भाविकांचा ओघ वाढणार असून, रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीजपुरवठा आणि वाहतूक नियोजनाबाबत सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. श्रद्धा आणि परंपरेची ही यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि तब्येतीची काळजी घेऊनच गड चढाई करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
यात्रेचे प्रमुख आकर्षण, वेळापत्रक
यंदा २ फेब्रुवारीला यात्रेचा मुख्य सोहळा रंगणार आहे.
२९ जानेवारीला पालखीचे आगमन व यात्रेला प्रारंभ
२ फेब्रुवारी (मुख्य दिवस)ला रात्री १२ वाजता बाबांच्या संदलाची व पालखीची भव्य मिरवणूक
६ फेब्रुवारीला उरूस कार्यक्रमाने सांगता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.