समृद्धीची संधी अर्ध्यावरच थांबणार का?
मुख्यमंत्री समृद्ध राज अभियानाच्या मुदतवाढीची सरपंचाकडून मागणी
बोईसर, ता. १ (वार्ताहर) : मुख्यमंत्री समृद्ध राज अभियानांतर्गत ग्रामीण भागातील घरपट्टी थकबाकीवर देण्यात आलेली ५० टक्के सवलत ही ग्रामपंचायतींसाठी मोठा दिलासा ठरली आहे. मात्र ही योजना ३१ डिसेंबरला संपल्याने अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले आहे. शिवाय ग्रामपंचायतीचा महसूलदेखील बुडत आहे. त्यामुळे या योजनेची मुदतवाढ करावी, अशी मागणी बोईसर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निलम संखे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
३ डिसेंबर २०२५ पासून लागू झालेल्या या योजनेमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली घरपट्टी नागरिकांनी भरली असून, ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. यासोबतच शासन व नागरिक यांच्यातील दुरावा काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र या योजनेची ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत अनेक ग्रामपंचायतींसाठी अपुरी ठरत असल्याचे चित्र आहे. ग्रामसभा आयोजित करणे, ठराव मंजूर करणे व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात वेळ गेल्याने काही ग्रामपंचायतींना या योजनेचा अपेक्षित लाभ पूर्णतः मिळू शकलेला नाही. बोईसर व पालघर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये आजही मिळकतधारक घरपट्टी भरण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात येत आहेत. मात्र योजना संपल्याने नागरिकांमध्ये नाराजी व निराशा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बोईसर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निलम संखे यांनी मुख्यमंत्री समृद्ध राज अभियानाच्या मुदतवाढीची मागणी केली आहे. नागरिक सहकार्य करण्यास तयार आहेत, ग्रामपंचायतींचा महसूल वाढतो आहे, मग ही योजना अर्धवट का थांबवायची?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ही मागणी त्यांनी जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अधिकृतरीत्या सादर केली आहे.
.............
मुख्यमंत्री समृद्ध राज अभियानाचा मूळ उद्देश शेवटच्या मिळकतधारकापर्यंत समृद्धी पोहोचवणे हा आहे. केवळ प्रशासकीय विलंबामुळे काही नागरिक या योजनेपासून वंचित राहिले, तर अभियानाच्या उद्देशालाच धक्का बसेल, असे मत निलम संखे यांनी व्यक्त केले. त्यामुळे शासनाने या योजनेची मुदत वाढवून अधिकाधिक नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.