निवडणुकीसाठी वसई-विरार महापालिका सज्ज
मुख्य निवडणूक निरीक्षक प्रदीप पी. यांचा दौरा; तयारीबाबत समाधान व्यक्त
विरार, ता. १ (बातमीदार) : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वसई-विरार शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक प्रदीप पी. (भा.प्र.से.) यांनी मंगळवारी वसई-विरार शहर महापालिकेस भेट दिली. यावेळी निवडणूक निरीक्षक उपेंद्र तामोरे हेही उपस्थित होते.
महापालिका मुख्यालयात मुख्य निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. बैठकीच्या प्रारंभी महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांनी आतापर्यंत करण्यात आलेल्या निवडणूक तयारीची सविस्तर माहिती सादर केली. यामध्ये प्रभाग रचना, वॉर्ड संख्या, मतदार याद्यांची स्थिती, प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांची स्थापना, मतदान केंद्रांची संख्या व त्यावरील सोयी-सुविधा, वाहन व्यवस्था, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती व प्रशिक्षण, सुरक्षा व्यवस्था, ईव्हीएम यंत्रांची उपलब्धता व वाटप, तसेच मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात आलेले उपक्रम यांचा समावेश होता. तसेच आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेली विविध पथके, निरीक्षण व्यवस्था व करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. या संपूर्ण सादरीकरणासाठी पीपीटी प्रेझेंटेशनचा वापर करण्यात आला. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना मुख्य निवडणूक निरीक्षकांनी यावेळी दिल्या.
....................
स्ट्रॉंग रूम व मतमोजणी व्यवस्थेची पाहणी
बैठकीनंतर मुख्य निवडणूक निरीक्षकांनी निवडणुकीसाठी उभारण्यात आलेल्या स्ट्राँग रूमची पाहणी केली. यासोबतच मतमोजणीसाठी करण्यात येत असलेल्या तयारी व सुरक्षाव्यवस्थेची माहिती घेतली. पुढे त्यांनी प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांना भेट देत तेथील कामकाज व तयारीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. महापालिकेमार्फत निवडणूक प्रक्रियेसाठी करण्यात आलेल्या आणि सुरू असलेल्या सर्व उपाययोजनांबाबत मुख्य निवडणूक निरीक्षकांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (निवडणूक) संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, मुख्य लेखापरीक्षक दिनकर जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी इंद्रजीत गोरे, पोलिस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सुहास बावचे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस अधीक्षक बारगजे, प्र. शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांच्यासह महापालिकेचे सर्व उपआयुक्त, कार्यकारी अभियंते व विभागप्रमुख उपस्थित होते.