उल्हासनगर, ता. १ (बातमीदार) : सुभाष टेकडी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या कठड्यावरील वजनदार काच कोसळण्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री उल्हासनगरात घडली. या घटनेत बाबासाहेबांना अभिवादनासाठी आलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार व कार्यकर्ते थोडक्यात बचावले.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे. निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर सुभाष टेकडी येथे विविध राजकीय पक्षांचे उमेदवार कार्यकर्त्यांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येत असतात. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह अभिवादन करत असतानाच, पुतळ्याभोवती लावलेल्या स्टील बॅरिगेट्सपैकी एका बॅरिगेटवरील मोठी काच अचानक तुटून कोसळली. त्या वेळी पुतळ्याच्या पायथ्याशी अनेक कार्यकर्ते उभे होते. ही काच दुसऱ्या दिशेने पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही; अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
आंबेडकर चौकात सुमारे दीड कोटी रुपये खर्चून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. १४ एप्रिलच्या दोन दिवसआधी या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, पुतळ्याचे व त्यासंबंधित बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी सुरुवातीपासूनच होत होत्या. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने यापूर्वी पुतळा व बांधकामाचे स्ट्रक्चर ऑडिट केले होते. त्या तपासणीत काही त्रुटी आढळल्यानंतर दुरुस्तीही करण्यात आली होती. पावसाळ्यात काही ठिकाणी गळती झाल्याचेही निदर्शनास आले होते.
बांधकामाला आठ महिनेही पूर्ण झाले नसतानाच आता संरक्षक कठड्यावरील काचा कोसळू लागल्याने सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बुधवारी कोसळलेली काच मोठी व वजनदार असल्याने अपघात टळला, ही केवळ नशीबाची बाब असल्याची चर्चा परिसरात होती. घटनेनंतर पुतळ्याचे तसेच संपूर्ण बांधकामाचे स्ट्रक्चर ऑडिट पुन्हा करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दुर्घटनेची भीती
वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते प्रा. सुरेश सोनवणे यांनी सांगितले की कोसळलेली काच सुमारे ४० किलो वजनाची असावी. स्टील बॅरिगेट्सला बसवण्यात आलेल्या काचांच्या नट-बोल्टला तडे गेले आहे. उर्वरित काचाही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. तातडीने दुरुस्ती न केल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.