उल्हासनगरमध्ये भाजपचे ‘एबी फॉर्म’ नाट्य
लक्ष्मी कुर्सीजा अधिकृत उमेदवार, कोमल लहरानींना धक्का
उल्हासनगर, ता. १ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पॅनेल क्रमांक १९-ब मध्ये भारतीय जनता पक्षाने एकाच जागेसाठी दोन ‘एबी फॉर्म’ दिल्याने मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला होता. ही प्रशासकीय चूक की जाणीवपूर्वक आखलेली रणनीती? या चर्चेने शहरात जोर धरला होता; मात्र बुधवारी झालेल्या अर्जांच्या छाननीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लक्ष्मी बंटी कुर्सीजा यांची उमेदवारी वैध ठरवत या सस्पेन्सवर पडदा टाकला आहे.
आगामी १५ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी ३० डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. भाजपच्या अधिकृत यादीत सुरुवातीला कोमल दिनेश लहरानी यांचे नाव चर्चेत होते; मात्र प्रत्यक्ष छाननीदरम्यान कोमल लहरानी आणि लक्ष्मी कुर्सीजा या दोन्ही उमेदवारांकडे भाजपचे ‘एबी फॉर्म’ असल्याचे समोर आल्याने निवडणूक अधिकारी आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये पेच निर्माण झाला होता.
निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक सहा यांच्या कार्यालयात बुधवारी अर्जांची पडताळणी करण्यात आली. सर्व कागदपत्रांची आणि पक्षाच्या अधिकृत पत्रांची तांत्रिक तपासणी केल्यानंतर लक्ष्मी बंटी कुर्सीजा यांना भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता देण्यात आली. तर कोमल दिनेश लहरानी यांचे नामांकन रद्द न करता ते ‘अपक्ष उमेदवार’ म्हणून ग्राह्य धरण्यात आले.
रणनीती की प्रशासकीय गोंधळ?
एकाच जागेसाठी दोन एबी फॉर्म देण्याच्या भाजपच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. ऐनवेळी अर्ज बाद होऊ नये म्हणून ही सावधगिरीची ‘बॅकअप’ रणनीती होती की पक्षांतर्गत समन्वयाचा अभाव, याबाबत कुजबुज सुरू आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माझ्या नामांकनावर अधिकृत शिक्कामोर्तब केले असून, मी भाजपची अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहे, अशी प्रतिक्रिया उमेदवार लक्ष्मी बंटी कुर्सीजा यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.