अंबरनाथ, ता. १ (वार्ताहर) : नवीन वर्षाच्या पहिल्याच पहाटे अंबरनाथच्या ऐतिहासिक शिवमंदिरात श्रद्धेचा महापूर उसळला. हर हर महादेवच्या गजराने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांनी नववर्षाचे स्वागत केले. नववर्षाची सुरुवात भगवान महादेवाच्या दर्शनाने व्हावी, या श्रद्धेने पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.
मुंबईपासून अवघ्या ६० किलोमीटर अंतरावर ठाणे जिल्ह्यात वसलेले अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर भारतातील ऐतिहासिक वारशाचा एक महत्त्वाचा ठेवा मानला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्षानिमित्त येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. नवे विवाहित, महिला-पुरुष, ज्येष्ठ नागरिक; तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भक्तिभावाने महादेवाचे दर्शन घेतले. सुमारे हजार वर्षांहून अधिक प्राचीन मंदिराची उभारणी शिलाहार घराण्यातील राजा मंडलेश्वर यांनी १०६०च्या दशकात केल्याचा उल्लेख भारतीय पुरातत्त्व विभागाला सापडलेल्या शिलालेखांत आढळतो. हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील भव्य रचना, कोरीव शिल्पकला आणि ऐतिहासिक वैभव आजही भाविकांसह इतिहासप्रेमींना आकर्षित करत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासह मुंबई व दूरवरून भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात.
मुंबई–पुणे रेल्वे मार्गावरील अंबरनाथ स्थानकापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर सहज पोहोचण्याजोगे असल्याने उपनगरीय भागातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले. सध्या मंदिर परिसरात सुशोभीकरणाची कामे सुरू असून, येत्या काळात येथे पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अंबरनाथचे हे प्राचीन शिवमंदिर श्रद्धा, इतिहास आणि भक्तीचा संगम ठरत असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.
नियोजनामुळे दर्शन शांततेत
मंदिर प्राचीन असल्याने काही ठिकाणी पडझड झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पूजा व अभिषेकास बंदी घातली आहे. मात्र, शिस्तबद्ध दर्शन व्यवस्था, प्रशासन व मंदिर समितीच्या नियोजनामुळे दर्शन प्रक्रिया शांततेत पार पडली, याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.