रेल्वेच्या नवीन वेळापत्रकामुळे प्रवाशांना दिलासा
गाड्या जलद, वेळेवर आणि अधिक सोयीच्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस, मेमू आणि डेमू गाड्यांचे नवीन वेळापत्रक आज (ता. १) पासून लागू झाले आहे. या बदलांमुळे गाड्यांची वेळ अधिक अचूक होणार असून प्रवाशांचा प्रवास कमी वेळात आणि अधिक नियोजित पद्धतीने होणार आहे. मुंबई सेंट्रल विभागात २९ गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता काही गाड्या लवकर सुटतील, तर काही गाड्या आधीपेक्षा वेळेवर गंतव्यस्थानी पोहोचतील, असे सांगण्यात येत आहे.
मुंबई सेंट्रल येथे सुरू असलेल्या बांधकामामुळे काही गाड्यांचे टर्मिनस बदलण्यात आले आहेत. ट्रेन क्रमांक १२९२५/१२९२६ पश्चिम एक्स्प्रेस आणि १२९०३/१२९०४ गोल्डन टेम्पल मेल या गाड्या आता मुंबई सेंट्रलऐवजी वांद्रे टर्मिनसवरून धावतील. तसेच २२२०९/२२२१० ही गाडी नवी दिल्लीऐवजी निझामुद्दीन येथेच थांबणार आहे. हे बदल प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची काळजी घेऊन करण्यात आले आहेत. गाड्या वेळेवर धावाव्यात, यासाठी २९ गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. काही गाड्यांच्या वेळा थोड्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या आधीच्या वेळेपेक्षा लवकर सुटणार आहेत.
...............................
काही नवे थांबे
प्रवाशांच्या सोयीसाठी काही गाड्यांना नवे थांबे देण्यात आले आहेत. मुंबई सेंट्रल-गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्स्प्रेसला वलसाड, नवसारी आणि आनंद येथे थांबे मिळाले आहेत. वांद्रे टर्मिनस-सुरत इंटरसिटी एक्स्प्रेसला उमरगाम येथे नवा थांबा देण्यात आला आहे.
...................
हरिद्वार-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस २४ मिनिटांनी, तर वांद्रे टर्मिनस-उदयपूर एक्स्प्रेस १० मिनिटांनी जलद झाली आहे. अशा लहान सुधारणा अनेक गाड्यांत करण्यात आल्या असून, त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. तसेच काही गाड्यांच्या मार्गांचा विस्तार करण्यात आला आहे. वापी-विरार गाडी आता मुंबई सेंट्रलपर्यंत धावणार आहे. नवीन वेळापत्रकामुळे गाड्या अधिक वेळेवर, जलद आणि सोयीस्कर होणार आहेत. रोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना याचा थेट फायदा होईल, अशी अपेक्षा पश्चिम रेल्वेने व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.