विधानसभा अध्यक्षांवर गुन्हा दाखल करा!
शासकीय कर्मचारी निवडणूक प्रचारात; सपकाळ यांचे निवडणूक आयुक्तांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : ‘विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा प्रकार हा आदर्श आचारसंहितेचा भंग करणारा आहे. त्यामुळे नार्वेकर यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, तसेच त्यांच्या कार्यालयातील तब्बल ७० अधिकारी व कर्मचारी नार्वेकर यांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात सक्रिय भाग घेत आहेत, या सर्वांवरही आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करून कारवाई करावी,’ अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी यासंदर्भात राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात सपकाळ म्हणाले, की ‘मुंबईतील कुलाबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २२५, २२६ व २२७ मधून राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर व वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, अर्ज दाखल करताना राहुल नार्वेकर हे स्वतः उपस्थित होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना नार्वेकर यांनी पोलिसांच्या माध्यमातून अर्ज दाखल करणाऱ्या विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावले, तसेच अर्ज भरण्यापासून रोखले. एका महत्त्वाच्या व संवैधानिक पदावरील व्यक्तीने लोकशाहीचे धिंडवडे काढून निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणला आहे. नार्वेकर यांच्यावर कारवाई करून राज्यात कायद्याचे राज्य आहे आणि निवडणूक आयोगाच्या पाठीचा कणा मजबूत आहे, हे आपण दाखवून द्यावे,’ असेही सपकाळ यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे संवैधानिक पदावर आहेत. कायदा धाब्यावर बसून दडपशाहीचा मार्ग अवलंबणे लोकशाहीचा खून करण्यासारखे कृत्य आहे.
- हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.