मुंबई

शिवसेनेच्या ''ममू'' ला मराठी-हिंदूने उत्तर!

CD

ठाकरेंकडून केवळ ठेकेदाराची नियुक्ती

आशीष शेलार : काेस्टल राेड भाजपचाच महत्त्वाकांक्षी प्रकल्प

मुंबई, ता. २ : कोस्टल रोड हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रकल्प असल्याचा दावा केला जाताे; मात्र ठाकरे यांच्या कार्यकाळात या प्रकल्पासाठी केवळ ठेकेदारांची नियुक्ती झाली. त्यापलीकडे कोणतेही ठोस काम झाले नाही. प्रकल्पासाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळवण्याचे महत्त्वाचे काम आमच्या सरकारने केले. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भाजपचाच असल्याचा दावा सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी शुक्रवारी ‘सकाळ संवाद’ कार्यक्रमात केला.

कोस्टल रोडच्या भरावामुळे तयार होणाऱ्या भूखंडावर कोणतेही बांधकाम होणार नाही, याची हमी द्यायला उद्धव ठाकरे तयार नव्हते. आमचे सरकार येताच आम्ही तत्काळ ही लेखी हमी दिली. यामुळे या मौल्यवान भूखंडावर कोणत्याही प्रकारची अतिक्रमणे, झोपड्या, इमारती किंवा व्यावसायिक उपक्रम होणार नाहीत, याची ग्वाही आम्ही मुंबईकरांना दिली आहे. हा परिसर केवळ मुंबईकरांच्या सुविधेसाठी आणि मोकळ्या जागेसाठी राखीव राहील, हा आमचा ठाम निश्चय आहे, अशी ग्वाहीही शेलार यांनी दिली. मराठी माणूस मुंबईतून विस्थापित हाेऊ नये, यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ताे भाजपसाेबतच आहे, असा दावा केला. या वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून मनसेला जवळ केले आहे; पण जागावाटपात त्यांच्यावर अन्याय केल्याचेही ते म्हणाले.
मुंबईतील नवीन रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन काम करतेय. यामध्ये राज्य आणि केंद्राचा वाटा असतो. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी एक रुपयाही दिला नव्हता. त्यामुळेच हा प्रकल्प रखडल्याचे शेलार म्हणाले.
-----
मराठी माणूस भाजपसोबत
मराठी माणसाला भाजपने मुंबईत स्थिरस्थावर केले आहे. त्यासाठी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, अभ्युदयनगर, पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प करत आहाेत. कुंभारवाडे विस्थापित होऊ नयेत म्हणून आम्ही काम करतोय. येथील संस्कृती, रोजगार टिकावी, नव्याने रोजगार यावा म्हणून प्रकल्प आणत आहोत. ठाकरे यांनी यातील काहीच केले नाही. त्यामुळे मराठी माणूस ठाकरे यांच्यासोबत नाही, तर भाजपसोबत आहे, हे वेळोवेळी झालेल्या निवडणुकीतील आकडेवारीवरून दिसते.

बंडखोरी, नाराजी
सर्वच राजकीय पक्षांमध्ये होत असलेले पक्षांतर, बंडखोरी, अखेरच्या वेळी तिकीट न मिळाल्याने केले जाणारे आरोप या सर्व घडामोडी वेदनादायक आहेत. अशा घडामोडींना भाजपमध्ये स्थान नाही. या भावना येण्याची काही कारणे आहेत. गेल्या साडेआठ वर्षांनंतर निवडणुका  होत आहेत. पुढील निवडणुका  कधी होतील, तेव्हा काय परिस्थिती असेल, याचा कुणालाच अंदाज नाही. त्यामुळे सध्या ५५-६० वयोगटातील जुने कार्यकर्ते आणि चाळिशीतील नवे कार्यकर्ते अशा दोन पिढ्या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून, त्यांना कुठल्याही परिस्थितीत संधी सोडायची नाही. त्यामुळे हे सर्व प्रकार सर्व पक्षांत घडत आहे. मुंबई भाजपमध्ये बंडखोरीचे प्रमाण किंवा नाराजांचे प्रमाण हे इतर पक्षांच्या तुलनेत नगण्य आहे.

सर्वसमावेशकतेच्या  दिशेने वाटचाल
राज्यात अनेक ठिकाणी भाजपचे स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी बाहेरील लोकांना पक्षात घेऊ नये म्हणून आवाज उठवत आहेत. त्यांच्या मनात ही भावना येणे स्वाभाविक आहे. पक्षावरील प्रेमापोटी ते असे बोलतात; मात्र भाजप एक मोठा पक्ष असून सर्वसमावेशकतेच्या  दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा अशा काही गोष्टी घडत असतात. जे बाहेरून आलेत, त्यांना पक्षाचे नियम पाळावे लागणार आहेत. काहीजण आमची विचारधारा स्वीकारत असतील तर त्यांना आम्हाला स्वीकारावे लागेल. या लोकांना स्वीकारून आम्ही एक प्रयोग करतोय, तडजोड नाही.

शिवसेना आऊटडेटेड!
मनसेला केवळ ५३ जागा देऊन उद्धव ठाकरे यांनीच  मनसेला संपवले आहे. उद्धव ठाकरे यांनी नेहमीच दुटप्पी भूमिका घेतली आहे. या वेळी त्यांनी मराठी माणसासाठी म्हणून राज ठाकरे यांच्याशी हातमिळवणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत  त्यांनी काँग्रेसशी आघाडी करीत मुस्लिमांना जवळ करून यश मिळवले होते. आता त्यांनी काँग्रेसला सोडून मनसेला जवळ केले आहे. या धोरणामुळे ठाकरे यांची शिवसेना लवकरच आऊटडेटेड होईल.

बूथ बांधणी
मतदार आणि समस्या बदलतात. मुंबई महापालिका निवडणुकीकडेही आम्ही त्याच दृष्टीने पाहत आहाेत. वाॅर्ड स्तरावरची ही निवडणूक असली तरी आम्ही बूथ स्तरावरचे सखोल नियोजन केले आहे. तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. प्रत्येक बूथवरून किमान ५१ टक्के मते मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यावर आमचा भर आहे.

डर बोलता है
निवडणूक रिंगणात भाजप स्वत:चेच नव्हे तर विरोधकांचेही  उमेदवार ठरवते, अशी आमच्यावर टीका केली जाते. हे सर्व भीतीपोटी होते. शेवटी डर बोलता है... विरोधकांनी भाजपचा एवढा धसका घेतला आहे, की ते नव्हे तर त्यांच्या मनात असलेली भीती अशा टीकेतून समोर येते.

वैयक्तिक टीका नाही
उद्धव ठाकरे आपल्या विरोधकांवर वैयक्तिक टीका करतात; मात्र आम्ही उत्तर देताना वैयक्तिक टीका करण्याचे टाळतो. ती आमची संस्कृती आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करताना ‘एक तर तू राहशील, नाही तर मी राहीन’ अशी व्यक्तिगत टीका केली होती. त्याला आम्ही अद्याप थेट उत्तर दिले नाही; मात्र पालिका निवडणुकीच्या माध्यमातून योग्य ते उत्तर देऊ.

...तर आमच्याकडे व्हिडिओची लायब्ररी 
शिवसेना-मनसेच्या युतीची घोषणा करताना राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वेगवेगळ्या भाषणांचे व्हिडिओ, फोटो आपल्याकडे असल्याचा इशारा दिला होता. जर त्यांच्याकडे व्हिडिओ असतील तर आमच्याकडे पूर्ण फिल्म आहे. व्हिडिओची अख्खी लायब्ररी आहे, हे त्यांनी विसरू नये.

ठाकरेंनी पैसे दिले नव्‍हते...
मुंबईतील नवीन रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन काम करतेय. यामध्ये राज्य आणि केंद्राचा वाटा असतो. या प्रकल्पासाठी राज्य आणि केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून देणे आवश्यक असते. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत एक रुपयाही दिला नव्हता. त्यामुळे या सुविधा मिळण्यास उशीर झाला, हे मुंबईकरांनी विसरू नये.

लोकल प्रवासी स्नेही हाेईल
मुंबईत लोकलची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ती गर्दी कमी व्हावी म्हणून राज्य सरकारने वेगवेगळ्या मेट्रो मार्गिकांच्या माध्यमातून, ॲक्वा लाइनच्या मदतीने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. मेट्रोच्या माध्यमातून मुंबईत सर्व विभाग कनेक्ट होणार आहेत. आज लाखो लोक मेट्रोने प्रवास करीत असल्याने लोकलवरील भार कमी होत आहे. रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, स्थानकातील सोयीसुविधा, सरकते जिने, फलाटांचे रुंदीकरण अशी कामे केल्याने सामान्य मुंबईकरांना दिलासा मिळत आहे. भविष्यात मुंबई लोकल सेवेमध्ये बदल दिसतील.
----
मुंबईसाठी विशेष ‘जलनीती’
मुंबईसाठी ‘जलनीती’वर भर देण्यात येणार आहे. पाणीटंचाईमुक्त मुंबई करून  मुंबईकरांना भेडसावणारा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी भाजप ‘जलनीती’ सुधारणार आहे. मुंबईत पडणारे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरवण्यासाठी शास्त्रीय योजना आखल्या जात आहेत. यासाठी नीती आयोगाच्या शिफारसी आणि जगभरातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा तसेच उपलब्ध डेटाचा सखोल अभ्यास केला जाईल. गेल्या ३० वर्षांत जे होऊ शकले नाही, ते आम्ही येणाऱ्या पाच वर्षांत करून दाखवू. पुढील पाच वर्षांत मुंबईत पाण्याचे दुर्भिक्ष राहणार नाही आणि पाणी नियोजनाच्या बाबतीत मुंबई जगात अव्वल क्रमांकावर असेल, असा आम्हाला विश्वास आहे. यासाठीची ‘ब्ल्यू प्रिंट’ आम्ही आधीच तयार केली असून, त्यावर युद्धपातळीवर काम केले जाईल. आमच्या येणाऱ्या वचननाम्यातदेखील आम्ही यावर भर देणार आहोत.
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasai Virar Election : वसई–विरार महापालिका निवडणुकीत माघारींचा धडाका; २८६ उमेदवार बाहेर; ५४७ रिंगणात!

Pune Political : उमेदवारी नाकारताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात खदखद; पुण्यात बैठकीत इच्छुकांचा गोंधळ!

Satish Bahirat : एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या पक्षनिष्ठेची, पुन्हा एकदा चर्चा!

Tamhini Ghat Accident: 'त्याच' थारवर जाऊन कार कोसळली; ताम्हिणी घाटात पुन्हा तसाच अपघात, एकाचा मृत्यू

Paithan Political : उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात; पैठणच्या राजकारणात उत्सुकता ताणली!

SCROLL FOR NEXT