पनवेलमध्ये सात उमेदवार बिनविरोध
भाजपचे सहा; एका अपक्षाची निवड
पनवेल, ता. २ (बातमीदार) ः पनवेल महापालिकेत भाजपचे सहा आणि एका अपक्षासह एकूण सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या घडामोडींमुळे भाजप महायुतीत उत्साहाचे वातावरण आहे. तर विरोधी महाविकास आघाडीत आत्मपरीक्षणाची चर्चा सुरू झाली आहे.
या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १८ मधून भाजपचे नितीन जयराम पाटील हे पहिले उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी सहा उमेदवार बिनविरोध झाल्याने भाजप महायुतीचा ‘विजयाचा षटकार’ पूर्ण झाला, तर एका अपक्ष उमेदवाराच्या निवडीमुळे एकूण सात जागा बिनविरोध निश्चित झाल्या.
चौकट
प्रभागनिहाय घडामोडी
प्रभाग क्रमांक १९ (अ) मध्ये भाजपच्या दर्शना भोईर आणि शेतकरी कामगार पक्ष आघाडीकडून दिव्या चांगदेव बहिरा यांनी अर्ज दाखल केले होते. दिव्या बहिरा यांनी अर्ज मागे घेतल्याने दर्शना भोईर बिनविरोध निवडून आल्या.
प्रभाग क्रमांक २०मध्ये भाजपचे अजय तुकाराम बहिरा तर शेकाप आघाडीकडून चांगदेव बहिरा आणि दिव्या बहिरा यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र दोघांनीही अर्ज मागे घेतल्याने बहिरा यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला आणि ते बिनविरोध निवडून आले.
याच प्रभाग क्रमांक २०मध्ये काँग्रेसच्या रुपाली शिंदे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपच्या प्रियांका तेजस कांडपिळे या बिनविरोध विजयी ठरल्या.
प्रभाग क्रमांक १९मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अर्चना अनिल कुलकर्णी यांनी कौटुंबिक कारणास्तव उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या रुचिता गुरुनाथ लोंढे या बिनविरोध निवडून आल्या.
७१ जागांसाठी निवडणूक
महापालिकेमध्ये महायुती व महाविकास आघाडी यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होत आहे. यामध्ये महायुतीच्या सहा आणि अपक्ष एक यांचा निवडणुकीआधीच निकाल लागल्यामुळे सद्य:स्थितीत ७१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, काही प्रभागांमध्ये अर्जांची संख्या लक्षणीय आहे. प्रभाग क्रमांक ३, प्रभाग क्रमांक ८मध्ये, प्रभाग क्रमांक १२ व १५ मधील या ठिकाणी बहुरंगी लढत होणार असून, बहुतेक ठिकाणी महायुती व महाविकास आघाडीमध्ये लढत होईल. प्रभाग क्रमांक दोन व प्रभाग क्रमांक आठमध्ये तुल्यबळ लढती असून, कळंबोलीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
दुहेरी बिनविरोध निकाल
प्रभाग क्रमांक १८मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या सेजल खडकबाण यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या पत्नी ममता प्रीतम म्हात्रे या बिनविरोध निवडून आल्या. याच प्रभागात अपूर्वा प्रभू आणि इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आमदार विक्रांत पाटील यांच्या भगिनी अपक्ष उमेदवार स्नेहल पाटील-ढमाले याही बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे एकाच प्रभागात दोन बिनविरोध निकाल लागल्याने भाजप महायुतीसाठी हा मोठा राजकीय लाभ मानला जात आहे.
आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले
शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पैशाच्या जोरावर विरोधकांचे अर्ज मागे घेतले जात असल्याचा आरोप करीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर टीका केली. या आरोपांमुळे निवडणूक प्रचाराच्या पुढील टप्प्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. मात्र भाजपने हे आरोप फेटाळून लावत विकासकामांवर आधारित विश्वासामुळेच हे निकाल लागल्याचा दावा केला आहे.
जल्लोष आणि गुलालाची उधळण!
बिनविरोध निवडींच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनी पनवेलमध्ये गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी करीत आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी दाखवलेला विश्वास अधिक जबाबदारीने पेलण्याचा निर्धार भाजप महायुतीच्या नेत्यांनी या वेळी व्यक्त केला.
८८ उमेदवारांचे अर्ज मागे!
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एकूण ८८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. ७८ पैकी सात जागा बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित ७१ जागांसाठी २५५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे येत्या काळात उर्वरित प्रभागांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता असून, पनवेलचे राजकारण अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.