‘वंचित’चा काँग्रेसला हिसका
पाच जागांवर मैत्रीपूर्ण लढत; हंडोरेंच्या मुलीला आव्हान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : तब्बल दोन दशकांनंतर मुंबई पालिकेत काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीची युती झाली खरी; मात्र या युतीमधील कटकटी थांबण्याचे नाव घेत नाहीत. मुंबईतील पाच जागांवर दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार असल्याचे आज (ता. २) स्पष्ट झाले. गेल्या पालिका निवडणुकीत यातील तीन जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. काँग्रेस नेते खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलीला वंचितने आव्हान दिले आहे.
मुंबईत काँग्रेस आणि ‘वंचित’मध्ये झालेल्या आघाडीतून ६२ जागा वंचितच्या वाट्याला आल्या. यातील १६ जागांवर वंचितला उमेदवार मिळाले नाहीत; मात्र वंचितने मुंबईतील काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या पाच जागांवर आपले उमेदवार कायम ठेवले आहेत. यातील तीन जागा काँग्रेसच्या, तर प्रत्येकी एक रासप आणि रिपाइं गवई गटासाठी सोडल्या होत्या. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे या जागांवर मैत्रीपूर्ण लढत देत असल्याचे काँग्रेस नेतृत्वाला कळवले असल्याचे वंचितकडून सांगण्यात आले.
...
येथे होणार लढत
मानखुर्दच्या १४० वाॅर्डातून राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांची मुलगी प्रज्योती हंडोरे या निवडणूक लढवत आहेत. वंचितने उमेदवार दिलेल्या ११६, १४०, १८१ या तिन्ही वॉर्डांत गेल्या पालिका निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. वॉर्ड क्रमांक १३३ रासपला, तर वॉर्ड क्रमांक १२५ गवई गटाला सोडण्यात आला होता.
...
संघर्ष पेटणार
या जागांवर वंचितने उमेदवार कायम ठेवल्यामुळे काँग्रेसचे नेते संतप्त झाले आहेत. एक तर १६ जागांवर वंचितला उमेदवार मिळाले नाहीत. दुसरीकडे काँग्रेसचा प्रभाव असलेल्या जागांवर वंचित कसे काय उमेदवार देऊ शकते, असा सवाल एका काँग्रेस नेत्याने केला आहे.
...
या जागांसाठी आम्ही सुरुवातीपासून आग्रही होतो; मात्र जागावाटपात त्या सुटल्या नाहीत. या जागांवर इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांचा आम्ही सन्मान केला. या जागांवर आता मैत्रीपूर्ण लढत होईल.
- सिद्धार्थ मोकळे, मुख्य प्रवक्ते, वंचित बहुजन आघाडी
...
काँग्रेसच्या कोट्यातील पाच जागांवर उमेदवार देण्याचे आणि मैत्रीपूर्ण लढतीचे वंचितने ठरविले आहे. आघाडीकरिता हा निर्णय थोडा गैरसोयीचा आहे; मात्र जागावाटपात ज्याप्रमाणे वंचितच्या मागण्यांचा आम्ही आदर केला, तसा याही वेळी करू.
- सचिन सावंत, काँग्रेस नेते