नवी मुंबइ ८३ अपक्ष रिंगणात
महापालिका निवडणुकीत पक्षांतर्गत नाराजीचा फटका
वाशी, ता. ३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत यंदा अपक्ष उमेदवारांची लक्षणीय उपस्थिती दिसून येत आहे. शहरातील विविध प्रभागांत एकूण ४९९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यापैकी तब्बल ८३ उमेदवार अपक्ष म्हणून आपले नशीब आजमावत आहेत. निवडणूक आयोगाकडून आज (ता. ३) या अपक्ष उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले असून, त्यानंतर प्रचाराला वेग आला आहे.
निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांना रिक्षा, शिट्टी, कुकर, गॅस सिलेंडर, सीसीटीव्ही कॅमेरा, पतंग, टेबल फॅन आदी सहज ओळखता येणारी चिन्हे दिली आहेत. ही चिन्हे मतदारांच्या लक्षात पटकन राहतील, या उद्देशाने देण्यात आली असून, त्याच आधारे अपक्ष उमेदवारांनी घराघरांत जाऊन प्रचार सुरू केला आहे. यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या वाढण्यामागे अनेक राजकीय कारणे पुढे येत आहेत. महायुती तसेच महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद, जागावाटपावरून निर्माण झालेली नाराजी, तसेच अनेक ठिकाणी अपेक्षित उमेदवारांना तिकीट न मिळाल्याने असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. परिणामी, अनेक इच्छुकांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा मार्ग स्वीकारला आहे. काही ठिकाणी तर पक्षातील अनुभवी कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकही अपक्ष म्हणून मैदानात उतरल्याचे चित्र आहे. महापालिका निवडणुकीसाठी सुरुवातीला एकूण ९५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननी आणि अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर २६९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे अखेर ४९९ उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत. यामध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), काँग्रेस, मनसे तसेच इतर छोट्या पक्षांचे उमेदवार आणि ८३ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
..............
स्थानिक पातळीवर प्रभाव
विशेष म्हणजे, काही प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवार स्थानिक पातळीवर प्रभावी ठरत असल्याचे चित्र आहे. स्थानिक प्रश्नांची सखोल माहिती, नागरिकांशी असलेला थेट संपर्क, सामाजिक कार्यातून निर्माण झालेली ओळख आणि नाराज कार्यकर्त्यांचे पाठबळ यावर अपक्ष उमेदवार आपली रणनीती आखत आहेत. त्यामुळे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसाठी हे अपक्ष उमेदवार ‘व्होटकटवा’ ठरण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. एकूणच, नवी मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा अपक्ष उमेदवारांची भूमिका निर्णायक ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, निवडणुकीचा निकाल केवळ पक्षीय समीकरणांवर नव्हे तर स्थानिक प्रभावावरही अवलंबून राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.