पर्यटकांना गुगल मॅपचा चकवा
सूचनाफलकांकडे दुर्लक्ष; थेट ‘नो एंट्री’मध्ये प्रवेश
पाली, ता. ३ (वार्ताहर) : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पाली येथील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी तसेच तळकोकणात जाण्यासाठी नववर्षात भाविक, पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. हजारो वाहने दररोज पाली शहरातून ये-जा करीत आहेत. मात्र गुगल मॅपवर ‘नो एंट्री’ असलेल्या रस्त्यांची नोंद नसल्याने अनेक वाहनचालक चुकीच्या मार्गाने जात असून, त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
पाली शहरातून विळे-निजामपूरमार्गे माणगाव, महाड, श्रीवर्धन तसेच तळकोकण व पुण्याकडे जाणारे मार्ग आहेत. तर खोपोली-पाली राज्य महामार्गावरून पुणे व मुंबईकडे जाणारी वाहतूक होते. या सर्व वाहनांना पालीतील अंतर्गत रस्त्यांवरूनच जावे लागते. पालीत प्रवेशासाठी स्टेट बँक चौक व शहराबाहेर पडण्यासाठी महाकाली मंदिर-विक्रम स्टँड मार्ग निश्चित करण्यात आला आहे. प्रवेश बंद व बाहेर पडण्याचे मोठे सूचनाफलक लावण्यात आले असले तरी गुगल मॅपवर त्याची नोंद नसल्याने वाहनचालक ‘नो एंट्री’मध्ये प्रवेश करतात.
अरुंद रस्ते, समोरासमोर येणारी वाहने आणि वाढती गर्दी यामुळे वाहनांना अडकून पडावे लागत असून नागरिक, भाविक व पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील सततच्या कोंडीमुळे कोकणकडे जाणारी वाहने पालीमार्गे वळवली जात असल्याने शहरातील वाहतूक आणखी वाढली आहे. महाकाली मंदिराजवळील लाल सिग्नल सध्या बंद अवस्थेत असल्याने कोंडीत भर पडत आहे.
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर बलाप गावावरून थेट बल्लाळेश्वर मंदिराच्या पाठीमागे झाप गावाजवळ बाह्यवळण मार्ग प्रस्तावित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा मार्ग होणार आहे. यासाठी बलाप, पाली, बुरुमाळी व झाप या गावांतील एकूण नऊ हेक्टर जागा लागणार आहे. मात्र हा बाह्यवळण मार्ग लालफितीत अडकला आहे. येथील काही शेतकऱ्यांचादेखील या बाह्यवळण मार्गाला योग्य मोबदला न मिळाल्याने व शासन मागण्यांची पूर्तता करीत नसल्याने विरोध आहे.
चौकट :
मुख्य कारण
पालीतील ‘नो एंट्री’ रस्त्यांची माहिती गुगल मॅपवर नसल्याने वाहनचालक चुकीच्या मार्गावर जात आहेत. शहरातील सर्व रस्ते रुंद करणे अशक्य असल्याने गुगल मॅप दुरुस्ती, अतिक्रमण हटवणे व बाह्यवळण मार्ग हाच दीर्घकालीन उपाय मानला जात आहे.
कोट
नो एंट्री मार्गाची गुगल मॅपवर नोंद झाल्यास वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात टळेल आणि भाविकांची गैरसोय होणार नाही.
- अमित निंबाळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य, पाली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.