काळोखे हत्या प्रकरण
------------------
तिसरा मारेकरी अटकेत
कोयत्याचा वार करून फरार; पुण्यातून ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३ ः खोपोलीतील मंगेश काळोखे यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आली. या हत्येत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. यातील तिसऱ्या आरोपीला पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासात रवींद्र देवकर यांनी सुपारी देऊन या तिघांना हत्या करण्यासाठी बोलावले होते. या खून प्रकरणात आतापर्यंत आतापर्यंत १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्ष हत्येत सहभागी असणाऱ्या तिसऱ्या आरोपीच्या अटकेनंतर या प्रकरणात कोण कोण सहभागी आहेत, याचा तपास वेगाने होण्यास मदत होणार आहे.
खालीद खलील कुरेशी (२३, रा. सय्यदनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. २६ डिसेंबरला सकाळी निर्घृण हत्येचा प्रकार घडल्यानंतर यातील तीनही आरोपी पसार झाले होते. दोन आरोपींना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आल्यानंतर शेवटचा वार करून पसार होणाऱ्या आरोपीचा तपास घेतला जात होता. या आरोपीला पुणे जिल्ह्यातील वानवडी पोलिसांनी अटक केली. हडपसरमधील हांडेवाडी भागात ही कारवाई करण्यात आली. आरोपी आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांनी काळोखे यांची सुपारी घेऊन खून केल्याची कबुली दिली.
सापळा रचला
खोपोलीतील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या खुनानंतर लगेचच नकाबंदी करण्यात आली होती. तरीही या नाकाबंदीला चकवा देत तिसरा हत्यारा पसार झाला होता. याचा तपास चालू असताना पुणे जिल्ह्यातील रामटेकडी औद्योगिक वसाहतीत एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याची चेन हिसकावण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पकडलेल्या आरोपींकडून खालीद हडपसरमधील हांडेवाडी भागात येणार असल्याची माहिती वानवडी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. चौकशीत खालीद याने खोपोलीतील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांचा दोन मित्रांशी संगनमत करून खून केल्याची कबुली दिली.
----
या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे. रवींद्र देवकर यांनी सुपारी देऊन बाहेरील मारेकरी बोलावले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांना सध्यातरी अटकेची गरज नाही; मात्र सर्व प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आलेला असून तिसऱ्या आरोपीकडून महत्त्वाची माहिती मिळणे आवश्यक आहे.
- आंचल दलाल, जिल्हा पोलिस अधीक्षक, रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.