बदलापूर, ता. १० (बातमीदार) : राज्य सरकारच्या ‘१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम’अंतर्गत कोकण विभागातून नगर परिषद स्तरावर कुळगाव-बदलापूर नगर परिषद कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. उत्कृष्ट प्रशासन, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि कार्यक्षम कार्यालयीन व्यवस्थापनासाठी नगर परिषदेला प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान व नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या विविध सुधारणा उपक्रमांना मिळालेल्या या यशामुळे बदलापूर शहराच्या प्रशासकीय क्षमतेवर राज्यस्तरावर शिक्कामोर्तब झाले आहे.
मोहिमेअंतर्गत कार्यालयीन शिस्त, सेवा गुणवत्तेत सुधारणा, नागरिक-केंद्रित कार्यपद्धती, वेळेत निर्णय प्रक्रिया; तसेच प्रभावी प्रशासन या सर्व निकषांवर नगर परिषदेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नागरिकांना सेवा सुलभ व जलद मिळाव्यात यासाठी ऑनलाइन प्रणाली व अधिकृत संकेतस्थळाचा प्रभावी वापर करण्यात आला. तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करत नागरिकांच्या तक्रारींवर वेळेत कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. ई-कार्यालय प्रणालीची अंमलबजावणी केल्याने फाईल प्रक्रिया जलद झाली असून, प्रशासनातील पारदर्शकता वाढली आहे.
स्वच्छता व्यवस्थेमध्ये करण्यात आलेल्या ठोस सुधारणा, क्षेत्रीय कार्यालयांद्वारे नागरिकांशी थेट संवाद, प्रत्यक्ष भेटींच्या माध्यमातून समस्या समजून घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना केल्यामुळे नगर परिषद अधिक उत्तरदायी व लोकाभिमुख झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. या सर्व बाबींचा सकारात्मक परिणाम प्रशासनाच्या एकूण कार्यक्षमतेवर दिसून आला आहे. उपक्रमांमुळे बदलापूर शहर अधिक सुव्यवस्थित, सुरक्षित आणि विकासाभिमुख होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या यशाबद्दल नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियंका दामले तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्यासह नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
मुख्याधिकाऱ्यांना श्रेय
उल्लेखनीय यशाचे श्रेय मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या दूरदृष्टीपूर्ण व परिणामकारक नेतृत्वाला दिले जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात आधुनिक सिग्नल यंत्रणेची उभारणी, प्रमुख चौकांचे सुशोभीकरण व रुंदीकरण, वाहतूक समस्यांवर ठोस निर्णय, तसेच शहराच्या विकासासाठी आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यात आले आहे. याशिवाय प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा समावेश करून कामकाज अधिक स्मार्ट व कार्यक्षम करण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.