प्रचाराचा आवाज वाढला
ठाणेकरांच्या शांततेत भंग
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : शहरात केवळ पोस्टरबाजी नाही, तर प्रचाराचा धुरळा हवेत उडताना दिसत आहे. गल्लीबोळांतील भोंगे, फिरत्या प्रचार रिक्षा आणि बँडबाजाच्या आवाजामुळे ठाणेकरांची शांतता भंग पावली आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून प्रचारासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे पुढील तीन दिवस ध्वनी प्रदूषणामध्ये आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे.
मंगळवारी (ता. १३) सायंकाळी प्रचार थांबणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष, प्रत्येक उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोर लावताना दिसतो आहे. सुमारे ६४० हून अधिक उमेदवार रिंगणात असल्याने ठाण्यातील बहुतेक प्रभागांमध्ये दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती रंगल्या आहेत. त्यासाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यांमध्ये पोहोचला आहे. उमेदवारांसह कार्यकर्त्यांचे जत्थेच्या जत्थे प्रभागांमध्ये पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. मतांसाठी मतदारांच्या पाया पडतानाही दिसत आहेत. तर कुठे शाब्दिक चकमकीही घडल्याचे उघडकीस आल्या आहेत.
शिवसेना शिंदे गट आणि भाजप युती विरुद्ध शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटांची महाविकास आघाडी अशी थेट राजकीय लढत पाहायला मिळते आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्रपणे मैदानात उतरले असून ८८ अपक्ष उमेदवारांनीही प्रचारात रंग भरला आहे. सुरुवातीला सत्ताधारी युती बाजी मारणार असे चित्र असले तरी, आता विरोधकांनीही प्रचारात आघाडी घेतल्याने लढत अधिकच रंगतदार झाली आहे. सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधकांनीही बॅनरबाजीवर जोर दिला असून परिवर्तनाची साद घालताना मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यासाठी घरोघरी भेटी, गल्लोगल्ली प्रचार यात्रा, हातात पत्रके आणि मोबाईलवर एआयआधारित व्हिडिओ-प्रचाराची प्रत्येक शक्य पद्धत वापरली जात आहे.
उमेदवारांची चढाओढ
समाजमाध्यमांवर उमेदवारांचे संदेश, भावनिक आवाहने आणि विकासाच्या हमींचा मारा सुरू आहे. असे असले तरीही प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची चढाओढ लागली आहे. चार प्रभागांचा एक पॅनेल असल्याने प्रत्येक प्रभागांमध्ये चार पॅनेलचे उमेदवार प्रचार करत आहेत. पॅनेलचा कधी एकत्रित तर कधी उमेदवारांचे स्वतंत्र प्रचार तंत्र सुरू आहे. त्यामुळे गल्लोगल्लीत आणि मुख्य रस्त्यांवरही प्रचाराच्या भोंग्यांनी कळस गाठला असल्याचे दिसून येते.
लक्षात ठेवा आपली निशाणी
रस्त्यांवर आणि अरुंद गल्ल्यांमधून फिरणाऱ्या प्रचार रिक्षा, ‘लक्षात ठेवा आपली निशाणी...’ असा जोरजोरात दिला जाणारा आवाज, सकाळपासून रात्रीपर्यंत न थांबणाऱ्या उद्घोषणांमुळे कानठळ्या बसत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.
आज सुपर संडे
उद्या प्रचाराचा शेवटचा रविवार आहे. त्यामुळे सकाळपासूनच उमेदवार गाठीभेटी, बैठका आणि प्रचार यात्रांमध्ये व्यस्त राहणार आहेत. सकाळी बैठकांचा धडाका, तर सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत गल्लोगल्ली प्रचार असा निवडणूक कार्यक्रम उमेदवारांनी आतापर्यंत पाळला; पण प्रचारासाठी उद्याचा सुपर संडे असल्याने संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्याची तयारी बहुतेक सर्व उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.