उमेदवारांच्या जाहीरनाम्यातून मैदाने गायब
ठाणे शहर, ता. १० (बातमीदार) ः ठाणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना उमेदवारांकडून आश्वासनांचा पाऊस पडत आहे; मात्र ठाणेकरांच्या आरोग्यासाठी आणि मुलांच्या भवितव्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या ‘खेळाच्या मैदानां’चा मुद्दा राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यातून गायब असल्याचे चित्र आहे. एकेकाळी ‘मैदानांचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात आज एकही मैदान सुस्थितीत किंवा अतिक्रमणमुक्त नसल्याने मतदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
३३ प्रभागांमधील १३१ जागांसाठी ६४१ उमेदवार रिंगणात आहेत. सुमारे १६.५ लाख मतदार आपला हक्क बजावणार आहेत. ‘आमच्या मुलांनी खेळायचे कुठे,’ असा थेट सवाल पालक विचारत आहेत. राजकीय पक्ष रस्ते, पाणी आणि वीज यावर बोलत असले तरी, अतिक्रमित मैदाने मुक्त करण्याबाबत सर्वच उमेदवारांनी ‘अळीमिळीगुपचिळी’ धरली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण १०४ मैदाने खेळासाठी आरक्षित आहेत; मात्र प्रशासनाच्या हलगर्जीमुळे या मैदानांची अवस्था दयनीय झाली आहे. पालिकेने अनेक मैदाने ठेकेदारांना भाड्याने दिली असून, तिथे खेळांऐवजी लग्नसोहळे आणि पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. मैदानांच्या मूळ क्षेत्रफळावर झोपडपट्ट्यांनी अतिक्रमण केले असून, काही ठिकाणी विकसकांनी या जागा बळकावल्या आहेत. जी थोडीफार मैदाने शिल्लक आहेत, ती खेळासाठी योग्य राहिलेली नाहीत.
ठाणे महापालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांकडून ठाणेकर मतदारांसमोर विकासाचे वचननामे ठेवले जात आहेत. कोणता विकास करणार आहोत, ते सांगितले जात आहे; परंतु अतिक्रमण आणि दुरवस्था झालेल्या मैदानाबाबत उमेदवारांकडून अळीमिळीगुपचिळी धरली जात आहे. मैदानाचे ठाणे म्हणून गौरविल्या गेलेल्या ठाणे महापालिकेच्या परिक्षेत्रात आजच्या घडीला एकही मैदान सुस्थितीत अथवा अतिक्रमणमुक्त झालेले दिसत नाही. त्यामुळे ठाणेकरांना मोकळा श्वास घेणे कठीण झालेले असताना उमेदवारांच्या प्रचारात मात्र मैदानाचे मुद्दे दिसत नसल्याने मतदारांमध्ये नाराजी दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी आणि आयुक्त या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. जो पक्ष किंवा उमेदवार ही मैदाने पुन्हा खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन देईल, त्यालाच आमचा पाठिंबा असेल, अशा प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहेत.
खेळाच्या मैदानांची स्थिती
विभाग - अतिक्रमित मैदाने
पाचपाखाडी ः
अतिक्रमण ४
खासगी वापर - १
नौपाडा :
अतिक्रमण - २,
खासगी वापर - १
माजिवडा ः
अतिक्रमण - ३
खासगी वापर - १
कोलशेत :
अतिक्रमण - ४
खासगी वापर - १
मानपाडा :
अतिक्रमण - ४
खासगी वापर - २
बाळकुम :
अतिक्रमण - १
भाईंदरपाडा :
खासगी - १
कावेसर :
खासगी - २
मुंब्रा :
अतिक्रमण - ५
कौसा :
अतिक्रमण - ४
खासगी वापर - १
दिवा :
अतिक्रमण - १५
दातिवली :
अतिक्रमण - ३
बेतवडे :
अतिक्रमण - १
आगासन :
अतिक्रमण - २
म्हातार्डी :
अतिक्रमण - २
खिडकाळी :
अतिक्रमण - १
शिळ :
अतिक्रमण - २
सांगर्ली :
अतिक्रमण - २
डायघर :
अतिक्रमण - १
देसाई गाव :
अतिक्रमण - १
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.