नवी मुंबईत पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षेसाठी तपासणी
इंदूरच्या धक्क्यानंतर प्रशासन सतर्क
नेरूळ, ता. १० (बातमीदार) : मोरबे धरणामुळे जलसमृद्ध शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईत नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी नियमित मिळते; मात्र इंदूरमध्ये नुकत्याच पिण्याच्या पाण्यातून घडलेल्या गंभीर दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिका सावध झाली असून, ‘जलस्रोत ते नळधारक’ या पूर्ण साखळीतील सर्व घाटांवर काटेकोर तपासणी सुरू केली आहे. पिण्याचे पाणी आणि सांडपाण्याच्या वाहिन्यांची जवळीलता भविष्यात धोका निर्माण करू शकते, याची शक्यता ध्यानात घेऊन महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही वेगवान केली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागास संपूर्ण जलव्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी, पडताळणी व सुधारणा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अतिरिक्त शहर अभियंता (स्थापत्य) अरविंद शिंदे यांनी कंत्राटदार व अभियंत्यांची विशेष बैठक घेतली. मोरबे धरणापासून भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, मुख्य जलवाहिन्या, जलउदंचन केंद्रे, वितरण जलवाहिन्या आणि शेवटच्या लाभार्थी घटकापर्यंत सर्व टप्प्यांचे परीक्षण सुरू झाले आहे.
विशेषतः गावठाण, झोपडपट्टी व अल्प- मध्यम उत्पन्न गटांच्या वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षेला प्राधान्य देत तपासणीची वारंवारता वाढवण्यात आली आहे. दैनंदिन निरीक्षण, पाणी गुणवत्ता निकष, नमुने तपासणी व प्रतिबंधात्मक उपाय अधिक कठोर करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
महापालिकेकडून नेहमीच पाण्याची गुणवत्ता शाबूत ठेवली जात असली तरी इंदूरची घटना ही ‘आकस्मिक दुर्घटना कधीही घडू शकते’ याची जाणीव करून देणारी असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. नागरिकांना सुरक्षित, शुद्ध व अखंड पाणीपुरवठा राखणे, हा प्रशासनाचा केंद्रबिंदू असल्याचेही सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.