भाजप १५०पेक्षा अधिक जागा जिंकणारच!
‘सामान्य माणसाची नाळ भाजप कार्यकर्त्यांशी जुळली आहे. त्यांचा नागरिकांशी रोजचा संपर्क आहे. ते केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सामान्य माणसांपर्यंत पोहाेचवीत आहेत. त्या योजनांचे लाभही लोकांना मिळत आहे. त्यामुळे मुंबईत भाजपच्या १५०पेक्षा जास्त जागा जिंकून येतील आणि मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल,’ असा ठाम विश्वास भाजपचे निवडणूक समन्वयक आणि प्रवक्ते प्रसाद लाड यांनी ‘सकाळ संवाद’मध्ये व्यक्त केला. ठाकरे बंधू शेवटची संधी म्हणून या निवडणुकीकडे पाहत असून ठाकरे ब्रॅँड चालणार नसल्याचे सांगत त्यांनी पक्षाचा निवडणूक अजेंडा मांडला.
-------------------------
‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र आले आहेत. ते आणि अमित-आदित्य शाखा-शाखांमध्ये फिरू लागले आहेत. पक्षाची बांधणी करीत आहेत. भाजपचे कार्यकर्ते ३६५ दिवस प्रभागांत काम करतात. समाजात तळागाळात काम करतात. भाजप कार्यकर्त्यांची नाळ सामान्यांशी जोडली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहाेचवीत आहेत. त्याचा लाभ सामान्यांना मिळत आहे. त्यामुळे महापालिकेत महायुतीची सत्ता येईल, असे लाड यांनी सांगितले. ठाकरे बंधूंना मुंबईच्या विकासाशी काहीही घेणेदेणे नाही. त्यांचा जीव टक्केवारीत अडकला आहे, असा आराेप करून महायुतीचाच महापौर होईल आणि त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच निर्णय घेतील,’ असेही त्यांनी पुढे सांगितले.
-----
ठाकरे ब्रॅँडची आधीच हवा निघाली
बेस्टमध्ये मराठी कामगार आहेत. ठाकरे ब्रॅँड म्हणून बेस्टमधील कामगारांच्या क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत ठाकरे ब्रॅंडची हवा केली होती. त्या निवडणुकीत मराठी कामगारांनी ठाकरे ब्रॅँडचा बॅण्ड वाजविला. त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र आल्याची भीती वगैरे काही नाही. पालिका निवडणुकीतही तेच होईल. खरेतर या निवडणुकीत ठाकरे ब्रॅंड कुठेच दिसत नाही. अमित ठाकरे, आदित्य ठाकरे आता कुठे शाखांवर फिरू लागले आहेत. भाजप कार्यकर्ते प्रभाग पिंजून काढत आहेत. विकासाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसह राज्यभरात प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. कोणालाही ब्रॅँडची पडलेली नाही. विकासामुळे मुंबईकर प्रभावित झाले आहेत.
सर्वांनाच विकास हवा...
मी पक्षाच्या निवडणुकीच्या प्रचार समितीत आहे. मुंबईतील निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती आम्ही ठरविली आहे. २० वर्षांत ठाकरेंची सत्ता असताना जो भ्रष्टाचार झाला, तो आम्ही मांडत आहाेत. २० ते ३५ वयोगटातील जेन झी मतदार हुशार आहेत. त्याला विकास हवा आहे. ४५ ते ६५ या वयोगटातील मतदाराला विकास हवा आहे. सर्वच वयोगटातील नागरिक विकासाच्या मुद्द्यावर सहमत असल्याचे दिसून येत आहे.
मराठी माणसांची हद्दपारी राेखणार
मराठी माणूस २० वर्षांत मुंबईबाहेर गेला आहे. त्याला जबाबदार शिवसेना आहे. त्याला थोपवण्यात त्यांना अपयश आले. गिरणी कामगार मुंबईतून हद्दपार झाला; पण बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला राज्य सरकारने गती दिली आहे. बेस्ट कामगारांना येथे घरे देणार आहोत. पुनर्विकासाच्या योजनांमध्ये मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होऊ नये, यासाठी अशा योजना आम्ही राबवत आहोत.
विकासाच्या मुद्द्यावरच भर
होय, आम्ही विकासावर भर दिला आहे. मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहोत. मेट्रोचे जाळे आम्ही तयार करीत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईचा कॅनव्हास बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. ५९ मिनिटांत मुंबईला प्रदक्षिणा पूर्ण होईल. ५६ किमी अंडरग्राउंड बोगदा तयार होत आहे. त्यात मुंबईकरांचा वेळ वाचेल. वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल. मुंबई मिठीत येईल, तेव्हा खऱ्या अर्थाने मुंबईकरांना आनंद होईल.
मुंबईत पाच काेटी झाडे लावणार
विकासावर भर आहेच; पण या वेळी पर्यावरणाचा जाहीरनामाही आम्ही प्रकाशित केला आहे. दरवर्षी एक कोटी झाडे लावण्याचा आमचा संकल्प आहे. पाच वर्षांत पाच कोटी झाडे आम्ही लावणार आहोत. त्यामुळे मुंबईचे पर्यावरण चांगले होईल, असा आम्हाला विश्वास आहे.
बेकायदा झोपड्यांबाबत...
कोरोना काळात वडाळा येथील खारजमिनीवर अतिक्रमणे झाली आहे. साडेचार हजार झोपड्या झाल्या आहेत. एक हजार ७० बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठविले. त्यांच्यामुळेच गुन्हेगारी वाढत आहे. ‘लव्ह जिहाद’सारख्या घटना घडत आहेत. ही जागा अतिक्रमणमुक्त व्हावी, यासाठी आम्ही विविध प्राधिकरणाच्या बैठका घेत आहोत. न्यायालयातही धाव घेतली आहे; पण हे वाढते अतिक्रमण थांबले पाहिजे.
--------
राष्ट्रवादीची मुंबईत ताकद नाही
राष्ट्रवादी काॅँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर दाऊदशी संबंध असल्यासारखे गंभीर गुन्हे आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांच्याबाबत युती करण्याबाबत विचार केला नाही. तसेच राष्ट्रवादीची मुंबईत फारशी ताकदही नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.